मुंबई : आज काँग्रेस (Congress) पक्षासाठी महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरू होती. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार?, काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील असणार की पुन्हा एकदा गांधी घराण्यातीलच कोणीतरी अध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. तब्बल 37 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, त्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. शशी थरुर (Shashi Tharoor) आणि मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता लवकरच काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीचा निकाल 19 ऑक्टोबरला लागणार आहे. या निवडणुकीबाबत काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी मोठं वस्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातून शशी थरुर यांना सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल असं देशमुख यांनी म्हटलं आहे. निवडणुकीबाबत बोलताना देशमुख यांनी म्हटलं की, ही निवडणूक काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाची आहे. मल्लिकार्जून खरगे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. याबद्दल वादच नाही. मात्र आम्ही ज्या पद्धतीने शशी थरुर यांचा प्रचार करत आहोत, थरुर हे महाराष्ट्रात देखील आले होते. यावरून आम्हाला खात्री आहे की त्यांना राज्यातून सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल.
थरुर यांना काँग्रेसमधून मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळत आहेत. गेले अनेक वर्ष काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता होती. मात्र आज काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकांचा पक्ष झाला आहे. या सर्व परिस्थितीतून थरुर हेच काँग्रेसला बाहेर काढू शकतील असा विश्वास काँग्रेसच्या सदस्यांना वाटत असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.