‘माझे शब्द मागे घेतो’, वारिस पठाणांकडून माफी नाहीच
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. (Waris Pathan on his controversial statement). तसेच आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याचा दावाही त्यांनी केला. यामागे एक राजकीय षडयंत्र असून त्यातूनच मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केल्याचा आरोप वारिस पठाण यांनी यावेळी केला. मी एक सच्चा भारतीय असून माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, असंही पठाण म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते.
वारिस पठाण म्हणाले, “माझ्या बोलण्याचा अर्थ केवळ इतका होता की सीएएच्या नावावर 15 कोटी मुस्लीम नाराज आहेत. तसेच संविधानावर विश्वास असणारे इतर धर्म आणि जातीचे लोक देखील त्यांच्यासोबत सहभागी होऊन विरोध करत आहेत. झाशीच्या राणीप्रमाणे वाघिणीसारख्या आमच्या बहिणी दिड महिन्यापासून रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. अशावेळी या देशातील केवळ 100 लोक 15 कोटी मुस्लिमांविरोधात दिसत आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या इतर काही संघटना पक्षांच्या लोकांचा समावेश आहे. मी याच्याकडेच इशारा करत ते 100 लोक असं म्हटलं होतं. म्हणूनच मी म्हटलं की आम्ही 15 कोटी या 100 लोकांना भारी पडू.”
“मी आधीही म्हटलं होतं की मला माझ्या भारत देशावर गर्व आहे. मी एक सच्चा भारतीय मुस्लीम आहे. माझ्या धर्मात आपल्या देशावर प्रेम आणि निष्ठा ठेवण्याची शिकवण लहानपणापासून दिली आहे. कुणीही माझ्या देशप्रेमावर प्रश्न उपस्थित करु शकत नाही. मी कधीही कोणत्याही धर्मावर टीका केलेली नाही. मी नेहमीच सर्व धर्माचा आदर केला आहे. मी या धर्मांवर श्रद्धा असणाऱ्या सर्वांचा सन्मान ठेवतो.”
LIVE TV: देशात चर्चा करावेत असे अनेक मुद्दे आहेत, त्यामुळे माध्यमांनी आता हा विषय संपवावा : इम्तियाज जलील https://t.co/er76ysKpnL pic.twitter.com/We7uzgCkRD
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2020
हे तेच 100 लोक आहेत जे या महान आणि सुंदर देशात एक कायदा करुन विभाजन करु पाहात आहेत. यात काही पत्रकारांचाही समावेश आहे. ते स्वतःला सर्वात मोठा देशभक्त असल्याचा दावा करत आहेत. ते रोज एक विषय घेऊन त्याचा विपर्यास करुन दाखवत आहेत. ते देशाची फसवणूक करत आहेत. मी हिंदू धर्माच्या आणि देशाच्या विरोधात असल्याचा भ्रम तयार केला जात आहे. कर्नाटकमधील गुलबर्गा शहरात मी सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील एका सभेत आम्ही 15 कोटी 100 ला भारी पडू असं विधान केलं होतं. त्याचा अर्थ मी माझ्या देशातील हिंदू बांधवांविरोधात असल्याचा अजिबात अर्थ होत नाही, असंही वारिस पठाण यांनी नमूद केलं.
“…तर मी माझे शब्द मागे घेतो”
LIVE TV: माझ्या कोणत्याही शब्दाने कुणाची भावना दुखावली असेल, तर मी ते शब्द मागे घेतो, मला भारतीय असल्याचा अभिमान : वारिस पठाणhttps://t.co/er76ysKpnL pic.twitter.com/sDZyx17Ztd
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2020
वारिस पठाण यांनी यावेळी राजकीय षडयंत्र रचून मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच आपले शब्दही मागे घेतले. ते म्हणाले, “मला ज्या पद्धतीने लक्ष्य केलं जात आहे त्याप्रमाणे मी काहीही बोललो नाही. राजकीय षडयंत्र रचून मला आणि माझ्या पक्षाची बदनामी केली जात आहे. असं असलं तरी माझ्या कोणत्याही शब्दामुळे जर कुणाची भावना दुखावली असेल, तर मी माझे शब्द मागे घेतो. मी या देशाचा खरा आणि प्रामाणिक नागरिक आहे म्हणूनच मी असं करत आहे.”
संबंधित बातम्या :
दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर, वारीस पठाणांना मनसेचा इशारा!
बेवकूफ, जाहील, एकत्र राहण्याच्या काळात असं बोलाल तर 15 कोटीच…
15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन,…
वारिस पठाण गुजरात आठवतंय का? : भाजप प्रवक्ते गिरीश व्यास
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
एमआयएम भाजपची बी टीम : बाळासाहेब थोरात
अखेर वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Waris Pathan on his controversial statement