NCP Ministers Meet Sharad pawar : शरद पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले, साहेबांना विनंती केली, पण… प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं भेटीचं नेमकं कारण
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तब्बल आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तब्बल आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. आम्ही गेल्या गेल्या शरद पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसेच ही बैठक पूर्वनियोजित नव्हती, अशी माहितीही त्यांनी दिली.
तब्बल तासभर शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. या भेटीत नेमकं काय झालं? शरद पवार यांनी काय सांगितलं? भेट कशी घडली? काय कारण घडलं? याबाबतची माहिती दिली. मात्र, भेटीची माहिती दिल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे देण्यास नकार दिला. तसेच राष्ट्रवादीच्या इतर कोणत्याही नेत्याने या भेटीवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. वेळ न मागता आम्ही आलो. शरद पवार हे चव्हाण सेंटरला मिटिंग निमित्त आल्याचं कळालं होतं. त्यामुळे संधी साधून आम्ही इथे आलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. सोबत आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं मत शांतपणे ऐकून घेतलं आहे. आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. सर्व मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आपआपल्या विभागागाची जबाबदारीही पार पाडणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
सर्वच मंत्री हजर
दरम्यान, आज अचानक राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि नरहरी झिरवळही होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या बैठकीला दिल्लीत हजेरी लावणार आहे. तर दुसरा गट बंगळुरूमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. त्यामुळेही या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.