Sharad Pawar : सरकार पडेल, निवडणुका कधी लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही, पण निवडणुकीसाठी आम्ही तयार; शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यात कुठे जायचं हा त्यांचा निर्णय आहे. पण राज्यकर्त्यांनी प्राधान्य सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना द्यायला हवं. सध्याच्या राज्यकर्त्यांना प्राधान्य वेगळं वाटत असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही.
नाशिक: विधानसभा निवडणुकीवरून (assembly election) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. सरकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ असणं आवश्यक आहे. लोक संकटात आहेत. विरोधी पक्ष नेते तिकडे भेटी देताय यातून मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा. स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधाभास तुम्हीच बघत आहात, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही (chhagan bhujbal) उपस्थित होते.
शरद पवार यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावर मत मांडले. न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. त्यामुळे एक मोठा वर्ग नाराज होणार आहे. हा वर्ग सत्तेच्या बाहेर जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे, असं सांगतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू. अगोदर ओबीसींबाबतचा निर्णय होऊ द्या. आमच्या घटक पक्षानी एकत्र निवडणूक लढवावी अशी तरी सध्या आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले. आपल संघटन खीळखीळ झालंय का? यावर बोलताना पवार म्हणाले, ज्या वेळेस निवडणुका लागतील तेव्हा जनता कौल देईल.
प्रकल्प रद्द करणे अयोग्य
जे प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केले. टेंडर निघाले त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. तसेच मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घेतल्यावर बघू, असंही ते म्हणाले.
दौऱ्यावर कुठे जायचं हा त्यांचा प्रश्न
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यात कुठे जायचं हा त्यांचा निर्णय आहे. पण राज्यकर्त्यांनी प्राधान्य सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना द्यायला हवं. सध्याच्या राज्यकर्त्यांना प्राधान्य वेगळं वाटत असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. स्वागताच्या कार्यक्रमावर भर द्यायचा की शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या हा विरोधाभास तुम्हीच बघत आहात, असंही ते म्हणाले. राज्य कशाप्रकारे चाललंय, याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत, असंही त्यांनी सांगितलं.