आम्हाला अजून संभ्रम…प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; आघाडीला सूचक इशारा?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करणारा भाजप हा पहिलाच राजकीय पक्ष ठरला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने अजूनही यादी जाहीर केली नाही. इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अद्यापही जागा वाटप पूर्ण केलंल नाही. त्यामुळे त्यांच्या मित्रपक्षातही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अकोला | 3 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पण महाविकास आघाडीचे अजूनही जागा वाटप झालेले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अचानक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माझे आदेश आल्याशिवाय महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमांना, बैठकांना जाऊ नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
प्रकाश आंबेडकर आज अकोल्यात होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्ही अजूनही महाविकास आघाडीचा घटक आहात का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना करण्यात आला. त्यावर, वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आम्हालाही संभ्रम आहे. आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत माहीत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अजून निरोप नाही
शरद पवार यांनी 6 तारखेला चर्चेला बोलावलं आहे. मुंबई सोडून ठिकाण असेल. मोदीबागेत माझे दोन मेव्हणे राहतात. त्यामुळे येता जाता शरद पवार यांना भेटणं होतं. पण सहा तारखेची भेट कुठे होईल माहीत नाही, असं सांगतानाच पाच ते सहा जागा देण्याबाबतचा आम्हाला काही निरोप आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मोदींनी अकोल्यातून लढावं
भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणासीतून तिकीट देण्यात आलं आहे. तुम्ही नेहमी मोदींवर टीका करता. मोदी आणि तुमचा सामना कधी रंगणार आहे की नाही? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. मी अकोल्यातूनच लढणार आहे. मोदींनी अकोल्यातून लढावं, मग आमनेसामने होईल, असं आंबेडकर म्हणाले.
भाजप 150च्या पुढे जाणार नाही
भाजपने अब की बार 400 पार म्हणोत की अजून काही. भाजप 150 जागा सुद्धा जिंकणार नाही, असा दावा करतानाच मी बिहार आणि उत्तर प्रदेशात गेलो नाही तरी तिथलं दहा टक्के मतदान इथे बसूनच फिरवू शकतो, असंही आंबेडकर यांनी सांगितलं.