Shivsena : ‘आम्ही ठाकरेंच्याच पाठीशी’; हर हर महादेवाचा गजर करत विरारमधल्या शिवसैनिकांचा महादेवाच्या पिंडीला रक्ताभिषेक!
विरारमधील शिवसैनिकांनी आपण शिवसेनेच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवण्यासाठी अक्षरश: आपल्या रक्ताने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला. यावेळी महिला शिवसैनिकदेखील होत्या.
विरार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे यांना समर्थ आणि खंबीरपणे पाठीशी असल्याचे दाखवण्यासाठी विरारमध्ये शिवसैनिकांनी चक्क रक्ताचा अभिषेक घातला आहे. विरार पूर्व स्टेशन जवळील शिवसेना शाखेच्या बाजूच्या शंकराच्या पिंडीवर बोटाला सुया टोचवून रक्त काढून हा अभिषेक घालण्यात आला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना या नावाने घोषणा देत आपल्या एकनिष्ठतेची पावतीही विरार शिवसैनिकांनी दिली आहे. पालघर (Palghar) उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, शहरप्रमुख मनीष वैद्य, शैलेंद्र घुडे यांच्यासह अन्य 50च्या वर शिवसैनिकांनी आपल्या बोटाचे रक्त काढून हा अभिषेक घातला आहे. शिवसेना मागील काही दिवसांपासून जास्त आक्रमक झाली आहे. एकीकडे शिंदे गटात काही शिवसैनिक जात आहेत. तर दुसरीकडे मूळ शिवसैनिक (Shivsainik) त्यांच्याविरुद्ध आक्रमक होताना दिसून येत आहेत.
‘आजन्म शिवसेनेसोबतच’
विरारमधील शिवसैनिकांनी आपण शिवसेनेच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवण्यासाठी अक्षरश: आपल्या रक्ताने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला. यावेळी महिला शिवसैनिकदेखील होत्या. हर हर महादेवचा गजर यावेळी करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आम्ही आजन्म राहणार, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. विरार पूर्व स्टेशनजवळील शिवसेना शाखेच्या बाजूच्या शंकराच्या मंदिरात आज (रविवार, 24) सकाळी 11.45 वाजता हा रक्ताभिषेक करण्यात आला.
शिवसैनिक नेमका कोणत्या गटाचा?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिक नेमका कोणत्या गटाचा असा संभ्रम निर्माण झाला असून कोणत्या गटाचे हे शिवसैनिकांना सिद्ध करावे लागत आहे. पालघर खा. राजेंद्र गावित, तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर यांच्यासह माजी नगरसेवक यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल. त्यानंतर वसई-विरारमधील अनेक शिवसैनिकांच्या एकनिष्ठतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण आम्ही फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आम्ही मूळचे आणि कडवे शिवसैनिक आहोत आणि अजन्म उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहणार अशी शपथ त्यांनी घेतली.
पदाधिकारी सहभागी
उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, शहरप्रमुख मनीष वैद्य यांच्या नेतृत्वाखाली, तालुका समन्वयक नरेश वैध, शहर सचिव राहुल झोरी, शहर सहसचिव शैलेंद्र घुडे, उपशहरप्रमुख आनंद चोरघे, प्रदीप साने, शैलेश देसाई, शेषी कदम, विभागप्रमुख प्रवीण आहिरे, मिलिंद वैध, रमेश गुरव, महिला उपशहरप्रमुख वैशाली कदम, नेहा वैद्य, शिला लष्करे यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.