अयोध्या : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा विषय बनलाय. शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी आणि रविवारी अयोध्येत असतील. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत अगोदरपासूनच अयोध्येत दौऱ्याची तयारी करत आहेत.
राम मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. आम्ही 17 मिनिटात बाबरी पाडली होती, तर अध्यादेश आणायला किती वेळ लागतो? राष्ट्रपती भवनापासून ते यूपीपर्यंत भाजपचं सरकार आहे. राज्यसभेतही अनेक असे खासदार आहेत, जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील. जो विरोध करेन, त्याचं देशात फिरणं मुश्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे रामभक्त म्हणून अयोध्येत येत आहेत. 1992 ला बाळासाहेबांच्या प्रेरणेने हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले होते. आम्ही रॅलीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी मागितलेली नाही. सरकारकडे आम्ही अध्यादेश आणण्याची मागणी केली आहे. यासाठी सरकारने कायदा बनवला पाहिजे. कोर्टाकडून अपेक्षा नाही. नोटाबंदीचा निर्णय 24 तासात होऊ शकतो तर राम मंदिरासाठी तसा निर्णय का नाही होऊ शकत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले आहेत. शनिवारी सर्व शिवसैनिक अयोध्येत पोहोचणार आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवस अयोध्येत असल्यामुळे रामजन्मभूमी भगवीमय होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्याची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता.