जनतेने आम्हाला न्याय देण्याची गरज, भुजबळांचं भावनिक आवाहन
नाशिक : प्रचाराची वेळ संपण्यापूर्वी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, यांच्याकडून खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. नाशिकच्या जनतेने आम्हाला न्याय देण्याची गरज आहे, अशी भावनिक साद त्यांनी घातली. विशेष म्हणजे नाशिकमध्ये मी केलेल्या कामांचं श्रेय मुख्यमंत्री घेत आहेत, […]
नाशिक : प्रचाराची वेळ संपण्यापूर्वी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, यांच्याकडून खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. नाशिकच्या जनतेने आम्हाला न्याय देण्याची गरज आहे, अशी भावनिक साद त्यांनी घातली. विशेष म्हणजे नाशिकमध्ये मी केलेल्या कामांचं श्रेय मुख्यमंत्री घेत आहेत, असा आरोपही भुजबळांनी केला.
“मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाड्याने आणलेली लोकं”
नाशिकमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका केली, पण त्यात असत्य बोलले. मुख्यमंत्र्यांच्या सभेला देखील गर्दी कमी होती, सभेला भाड्याने आणलेली लोक होती. पालकमंत्री असताना मीच कुंभमेळ्याची कामं मंजूर केली होती आणि नंतर आमचं सरकार गेलं आणि त्यांचं सरकार आलं. मुख्यमंत्री यांनी कुंभमेळ्यात एक नवा पैसा दिला नाही. हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी कुंभमेळ्याला एक रुपया दिला नाही, असा आरोप भुजबळांनी केला.
“मुख्यमंत्र्यांनी हक्काचं पाणी गुजरातला दिलं”
मांजरपाडा प्रकल्प मी केलाय, मुख्यमंत्री यांनी नाही. नारपार प्रकल्पाचे पाणी मुख्यमंत्री यांनी पळविले आहे. पाण्याचा हक्क गुजरातला दिला, तसे पत्र मुख्यमंत्री यांचं आहे. श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्री केविलवाणा प्रयत्न करताय, तुरुंगातून मी पाठपुरावा केलाय. भुजबळ स्वातंत्र्य सैनिक नाही, कारण माझा जन्म नंतर झालाय. तुम्ही आणि आरएसएसने ‘चले जाओ’ला विरोध केला होता, स्वातंत्र लढ्याच्या गप्पा मारू नका, असा टोलाही भुजबळांनी लगावला.
“खोट्या केसेस करणाऱ्यांना आम्ही उत्तर देऊ”
खारघरच्या केसबाबत कुठलाही पुरावा नाही, म्हणून कोर्टाने समीर भुजबळ यांना जामीन दिला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझ्यावरील आरोप योग्य नाही असे पत्र दिले होते, म्हणून त्यावेळी अनेक पेपरने छापले की भुजबळांच्या मागे शिवसेना आहे. प्रधान सचिव आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला क्लिनचिट दिली. तुम्ही ठरवलं काय? मला कायम स्वरूपी अटक करायची का? अशा पद्धतीने दबाव आणता का? मी तुरुंगात जाणार आहे हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्या दादागिरीला भीक घालत नाही. मुख्यमंत्र्यांनी खोट्या केसेस टाकल्यात. खोट्या केसेस टाकणाऱ्याला सुद्धा जेलमध्ये जावं लागतं, मुख्यमंत्री यांनी लक्षात ठेवावं, असं म्हणत खोट्या केस करणाऱ्यांना आम्ही उत्तर देऊ, असा इशाराही भुजबळांनी दिला.
पुलवामा हल्ल्यात प्रधानमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही भुजबळांनी केला. त्यांनी जबाबदारी घेऊन सत्ता सोडायला पाहिजे होती. पुलवामा, श्रीलंका येथे हल्ला झाल्यानंतर शव पाहायला मिळाले, बालकोटमधील त्यांचे शव समोर आले नाही. निवडणुकीच्या तोंडावर बाजी मारण्यासाठी मुख्यमंत्री केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
“मुख्यमंत्र्यांना भाषण करताना धापा लागतात”
दरम्यान, भुजबळांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषण शैलीवरही टीका केली. मुख्यमंत्र्यांना भाषण करताना धापा लागतात, आरडाओरड करतात, असं वाटतं काय होईल. आमच्याकडे भाषण करण्याची अंगभूत कला आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, समीर भुजबळ यांची मी माघार घेतो, महाराष्ट्र सदन, आरटीओबाबत जी कामे केली त्यात एक रुपया दिला का? हे सांगा, सर्व फुकट बांधून घेतलंय, तर मग भ्रष्टाचार कसा? आणि दिला असेल तर सिद्ध करून दाखवा, असं आव्हान भुजबळांनी दिलं.