औरंगाबाद : पाच राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर अनेकांना पंख फुटलेत, जग जिंकल्यासारखं वाटतंय. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. औरंगाबादच्या रुख्मिणी सभागृहात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
आम्ही सर्व्हे करतोय त्यानुसार मोदींना मतदान देऊ असं लोक म्हणत आहेत. जे लोक पंख असल्यासारखं उडत होते, त्यांना शंभर जागा मिळणार नाहीत. काँग्रेस राफेलवर बोलत आहेत, ऑगस्टा वेस्टलँडमध्ये त्यांच्या दलालीची भांडाफोड होणार होती म्हणून ते बोलत आहेत. राफेलच्या आड येऊन ते कव्हर फायर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला.
देशात दलाल कोण असतील तर ते काँग्रेस आहे, त्यामुळे हे निवडून आले तर देशाची दलाली करतील, असा आरोप फडणवीस यांनी केला. येणाऱ्या निवडणुकीत संघटनेच्या कामावर निवडणून यावं लागेल. भारतात युवा मतदार महत्वाचा आहे. जो पक्ष या युवकांपर्यंत पोहोचेल त्यांना आपले ध्येय धोरण सांगू शकेल तोच यशस्वी ठरू शकतो. मोदींनी केलेल्या कामांमुळे आपण ताठ मानेने जाऊ शकतो, असं त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.
तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. हिंदी हार्टलँड असणाऱ्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली. तर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तब्बल 15 वर्षांनी सत्ता मिळवली.
या पराभवाने खचून जाऊ नका यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वापासून ते स्थानिक नेतृत्त्वापर्यंत सर्वांकडून मनोबल वाढवण्याचं काम सुरु आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत नुकतीच भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी लोकांमध्ये मिसळून सकारात्मक राहण्याचा सल्ला खासदारांना दिला.