अमरावती : आज अमरावतीमध्ये (Amravati) नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये आज जल्लोष सुरु आहे. सकाळपासून अनेक राजकीय नेत्यांनी दहीहंडी महोत्सवाला उपस्थिती लावली आहे. विशेष म्हणजे आज तिथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली. ज्यावेळी फडणवीसांनी हातात माईक घेतला त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरात घोषणा दिल्या. तसेच फडणवीसांनी उपस्थितांच्यासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हटली आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने सुध्दा तिथं आज उपस्थिती लावली असून त्याने एका गाण्यावर डान्स केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या मते उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर गोविंदा याने सुध्दा हनुमान चालिसाचे वाचन केले. त्यावेळी स्टेजवर नवनीत राणा, रवी राणा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे यांची उपस्थिती होती. दहीहंडीच्या ठिकाणी अनेक लोक जमले असल्याने दहीहंडीची अधिक चर्चा सुरु आहे.
तरुण तडफदार अशी रवी राणा यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आपलं सरकार कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे बंदीस्त होतं, आता दहीहंडी, गणपती उत्सव, दिवाळी जोरात साजरी करायची आहे. हे सरकार कुणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा वाचणाऱ्यांचा सत्कार करणार आहे. महाराष्ट्रात पाप झाले तेव्हा राणा दाम्पत्य आलं, त्यांनी म्हटलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल पण हनुमान चालीसा म्हणणार असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. हनुमान चालीसासाठी 14 दिवस जेलमध्ये राहणाऱ्या राणा दाम्पत्यांचा अभिमान आहे. मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चांगल्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे असं देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना सांगितलं.
बेघर महिलेला घर बांधून देणारे राणा दाम्पत्य खरे गरीबाचे कैवारी आहे. आता मागे वळून पहायचं नाही, विकास करायचं आहे. दहीहंडी फोडल्यानंतर मलई सर्वांनी खायची असते, आम्ही विकासाची मलई सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत असंही फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर आज दहीहंडीला विशेष उपस्थिती असणारे गोविंदाने देखील हनुमान चालिसा म्हटला, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नवनीत राणा रवी राणा यांना देखील शुभेच्छा दिल्या.