नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू झाला, असा दावा भापज कार्यकर्त्यांनी केला होता. या आरोपांमुळे ममता यांनी मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमाला उपस्थित न राहाण्याचा निर्णय घेतला आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, बंगाल हिंसाचार प्रकरणी करण्यात येत असलेले सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत, त्यामुळे त्या नाईलाजाने मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
The oath-taking ceremony is an august occasion to celebrate democracy, not one that should be devalued by any political party pic.twitter.com/Mznq0xN11Q
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 29, 2019
“बंगालमध्ये कुठलीही राजकीय हत्या झालेली नाही. या हत्या वैयक्तिक शत्रूता, कौटुंबीक वाद आणि इतर विवादांमुळे झाल्या असाव्या. यांचा राजकारणाशी संबंध नाही. आमच्याजवळ असा कुठलाही रेकॉर्ड नाही”, असं स्पष्टीकरण ममता बॅनर्जींनी दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील काही सदस्य गुरुवारी 30 मे रोजी शपथ ग्रहण करतील. यावेळी बिम्सटेक देशांचे प्रतिनिधी, ख्यातनाम लोक, राजकारणी आणि 54 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याशिवाय किर्गिस्तानचे राष्ट्रपती सुरोन्बे जीनबेकोव आणि मॉरिशअसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचारात मृत्यू पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून आमंत्रित करण्यात आलं आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला कोण-कोण येणार
शपथग्रहण सोहळ्याला कोण गैरहजर राहणार
पश्चिम बंगालमध्ये भाजपची स्थिती
नुकत्याचं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवला. देशात भाजपप्रणित एनडीएने 542 पैकी 352 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्येही पक्षाची कामगिरी उल्लेखनिय ठरली. तृणमूल काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ही संख्या केवळ दोन होती.