Dhananjay Munde | धनंजय मुंडे प्रकरणात 72 तासात काय काय झालं?
धनंजय मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर झालेल्या आरोपानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध भूमिका मांडली जात आहे.
मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन आता राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. रेणू शर्मा नावाच्या एका तरुण गायिकेनं ओशिवरा पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका फेसबुकवरुन मांडली आहे. (What happened 72 hours after Dhananjay Munde was accused of rape?)
महाविकास आघाडीची सावध भूमिका
महाविकास आघाडीतील धनंजय मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर झालेल्या आरोपानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध भूमिका मांडली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. “राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकतीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयातही यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलीय.
धनंजय मुंडे प्रकरणावर काँग्रेसच्या नेत्याकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी सर्व खुलासे केले आहेत. त्यामुळे आता इतरांनी त्यावर बोलणे योग्य नाही, असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
शिवसेना धनंजय मुंडेंच्या पाठीशी
‘प्यार किया तो डरना क्या’, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.
भाजप नेते आक्रमक
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर विरोधी पक्ष असलेला भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील सहकारी असलेली शिवसेना मुंडेंच्या मदतीला धावली आहे. हिंदू धर्मात दुसरा विवाह मान्य नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसंच शरद पवार हे राजकारणात नैतिकतेची अपेक्षा बाळगतात. तेव्हा ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा नक्की घेतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/PVrlONAoBb
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2021
दरम्यान, भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही भाजप नेत्यांकडून देण्यात आला आहे.(What happened 72 hours after Dhananjay Munde was accused of rape?)
संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही – फडणवीस
“धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याती आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचं सांगितलं आहे. असं संशयाचं वातावरणं राहणं योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदरंभातील सत्य बाहेर आणावं. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आलं की, आम्ही आमची मागणी करु”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Minister Dhananjay Munde issue Our Actions
1. Complaint to Election Commission
2. Appeal to Governor & CM to remove The Minister
3. Compalint with Police for Action for more than One Wife IPC 494
4. Police should register case & initiate action on Smt Renu Sharma Complaint
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 13, 2021
धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडल्याचे समजते.
तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर
गुरुवारी पहाटे मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.
संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
“हा पूर्णपणे धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. हे आपण मुंडे यांच्यावर सोडलं पाहिजे, ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय़ घ्यावेत आणि काय नाही याचा सर्वात जास्त अनुभव कुणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना आहे”, असं प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हस्तक्षेप नाही – जयंत पाटील
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा हस्तक्षेप नाही, त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. पण कुणी मागणी केल्यानं राजीनामा घेतला जात नाही. धनंजय मुंडे प्रकरणात पक्षांतर्गत चर्चा करु आणि गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेऊ, असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?
नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य
धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी
What happened 72 hours after Dhananjay Munde was accused of rape?