1999 ते 2018 शिवसेनेच्या घटनेत काय बदल झाला? अध्यक्ष यांनी का घेतला 1999 च्या घटनेचा आधार?
कोणताही पक्ष चालविण्यासाठी त्या त्या पक्षाची घटना असणे आवश्यक असते. त्यातील नियमानुसार त्या त्या पक्षाचे पदाधिकारी, नेते निवडले जातात. त्यातही महत्वाचे म्हणजे त्या त्या पक्षाची नोंद निवडणूक आयोगाकडे असणे क्रमप्राप्त असते.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असा निकाल जाहीर केला. त्याच सोबत त्यांनी शिवसेनेची 2018 ची घटना अमान्य करत 1999 च्या घटनेचा आधार घेतला. पक्षप्रमुख मनमर्जीने कुणालाही हटवू शकत नाही असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. निवडणूक आयोगाकडे 1999 ची शिवसेना पक्षाची घटना आहे. तर, 2018 मधील घटना दुरुस्तीची प्रत निवडणूक आयोगाकडे नाही त्याआधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 2018 ची जी घटना दुरुस्ती अमान्य केली त्यात काय बदल केले होते आणि 1999 च्या घटनेत काय म्हटले आहे ते पाहणे आवश्यक आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली शिवसेनेची घटना
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना 1966 साली केली. त्यावेळी तो प्रादेशिक पक्ष होता. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची घटना 1976 मध्ये तयार केली. त्या घटनेनुसार 13 सभासदांची कार्यकारिणी ठरविली गेली. त्यात सर्वोच्च पद हे ‘शिवसेनाप्रमुख’ यांच्याकडे राहील असे जाहीर केले गेले. घटनेत कलम १ मध्ये शिवसेना पक्ष प्रमुख हे पद सर्वोच्च आहे. प्रतिनिधी सभेतून निवडून आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांना काढून टाकण्याचा अधिकार हा प्रतिनिधी सभेला आहे असे म्हटले आहे.
राज्यस्तरीय पक्षाची मान्यता आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह
कोणताही पक्ष चालविण्यासाठी त्या त्या पक्षाची घटना असणे आवश्यक असते. त्यातील नियमानुसार त्या त्या पक्षाचे पदाधिकारी, नेते निवडले जातात. त्यातही महत्वाचे म्हणजे त्या त्या पक्षाची नोंद निवडणूक आयोगाकडे असणे क्रमप्राप्त असते. त्यावेळी शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या आधारे निवडणूक आयोगाने 1989 साली शिवसेनेला राज्यस्तरीय पक्षाची मान्यता देत ‘धनुष्यबाण’ चिन्ह दिले.
राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पक्ष नेतृत्वाची रचना
शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये पक्षातील सर्वोच्च पद हे ‘शिवसेना प्रमुख’ असल्याचे म्हटले आहे. त्याखालोखाल राष्ट्रीय कार्यकारिणीचे स्थान आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण 19 नेत्यांचा समावेश आहे. परंतु, यातील 14 सदस्य हे प्रतिनिधी सभेने निवडलेले तर उर्वरित पाच सदस्य हे शिवसेना प्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसार करू शकतात असे म्हटलं आहे. कार्यकारिणी सदस्यांना नेते म्हटलं जाईल असे यात नमूद आहे.
प्रतिनिधी सभा
नेते यांच्यानंतर उपनेते, राज्य कार्यकारिणी, राज्यप्रमुख, जिल्हा प्रमुख यांचा समावेश असल्याचा उल्लेख या घटनेत आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदे निर्माण करण्यात आली आहेत. यात ग्रामीण भागासाठी राज्य संपर्क प्रमुख, उपराज्य प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख तर शहरांसाठी विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, विभाग संघटक, उप विभाग संघटक, शाखा प्रमुख, उप शाखाप्रमुख तसेच संसद आणि विधिमंडळातील निवडून आलेले सदस्य अशी ही रचना आहे.
घटनेनुसार यापैकी परिशिष्ट A मधील पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून तर परिशिष्ट B मधील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते असे या घटनेत म्हटले आहे. तसेच, शिवसेना प्रमुख यांच्या अनुपस्थितीमध्ये प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी निवडलेल्या नेत्याकडे बैठकांचे अध्यक्षपद असेल असा यात उल्लेख आहे.
शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीचा कालावधी
शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांची निवड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच तीन महिन्यातून एक बैठक राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व्हावी असेही यात म्हटले आहे.
2003 मध्ये कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड
जानेवारी 2003 मध्ये महाबळेश्वर इथे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अर्थात पक्षाचे अधिवेशन होते. तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांनी याच अधिवेशनात एक महत्वाचा ठराव मांडला. शिवसेनाप्रमुख यांना असलेल्या अधिकारानुसार उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात यावे. तसेच, त्यांची नियुक्ती कार्याध्यक्ष म्हणून करावी असा हा ठराव होता. हा ठराव मंजूर करण्यात आला आणि अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाची धुरा आली.
आदित्य ठाकरे यांची युवासेना म्हणून घोषणा
2010 साली दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेनेची घोषणा केली. नातू आदित्य ठाकरे याच्याकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवीट असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी ‘उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या. असे भावूक उद्गार त्यांनी काढले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचे वय अवघे 22 वर्ष इतके होते.
बाळासाहेब यांचे निधन आणि उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख म्हणून निवड
आदित्य ठकारे यांची युवासेना प्रमुख नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात शिवसेनाप्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणारा अशी चर्चा होती. परंतु, उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख हे पद रिक्तच राहिल असे जाहीर केले त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेमध्ये पक्षप्रमुख हे नवे पद निर्माण करण्यात आले आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या घटनेत मुलभूत बदल केले. मात्र त्याची नोंद निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या घटनेत नाही. कोणत्याही पक्षामध्ये बदल झाल्यास पक्षाचे नाव, कार्यालय, पदाधिकारी किंवा इतर कोणत्याही बदलाची माहिती ही निवडणूक आयोगाला देणे आवश्यक असते. खासदार अनिल देसाई यांनी 2018 मध्ये पदाधिकारी निवडीबाबत आयोगाला माहिती दिली. मात्र, घटनादुरुस्तीची माहिती दिली नव्हती. हाच नेमका कळीचा मुद्दा ठरला आणि त्या आधारेच समोर आलेल्या पुराव्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची याचा निर्णय दिला.