दलित नेत्यांमधील वर्चस्वाच्या लढाईतून आठवलेंवर हल्ला?
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. दलित नेत्यांमधल्या वर्चस्वाच्या लढाईतून हा हल्ला झाल्याचा आरोप केला जातोय. वर्चस्वाची नेत्यांची लढाई आता रस्त्यावर आली आहे. मात्र ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची परंपरा नाही, याची समज नेत्यांनी कार्यकर्त्यांना देण्याची गरज निर्माण झाली आहे. रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. […]
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. दलित नेत्यांमधल्या वर्चस्वाच्या लढाईतून हा हल्ला झाल्याचा आरोप केला जातोय. वर्चस्वाची नेत्यांची लढाई आता रस्त्यावर आली आहे. मात्र ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची परंपरा नाही, याची समज नेत्यांनी कार्यकर्त्यांना देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. ठिकठिकाणी रास्ता रोको आणि बंद पुकारण्यात आले. आठवलेंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला. वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यकर्ते रस्यावर उतरले.
नुकतेच एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झालेत. त्यातले निष्कर्ष हे सत्ताधारी भाजपला अनुकूल नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंवर हल्ला झालाय.
रामदास आठवलेंवर हल्ला करणारा प्रवीण गोसावी हा अमरावती जिल्ह्यातला असून तो सध्या अंबरनाथमध्ये वास्तव्याला आहे. सुरूवातीच्या काळात रिक्षाचालक असलेला प्रवीण गोसावी मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी होती. आता तो बांधकाम व्यावसायिक आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे.
मनसेत मतभेद झाल्यानंतर तो पक्षातून बाहेर पडला. त्यावेळीही त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केलं होतं. त्यानंतर तो आरपीआयच्या आठवले गटात सक्रिय झाला. मात्र या पक्षातही तो जास्त वेळ रमला नाही. इथून बाहेर बडल्यानंतर त्याने रामदास आठवलेंच्या विरोधात विखारी पोस्ट टाकल्या.
भारिप बहुजन महासंघ या प्रकाश आंबेडकरांच्या पक्षासोबत प्रवीण गोसावीची जवळीक असल्याचा आरोप केला जातोय.
‘मी लोकप्रिय नेता असल्याने कदाचित कोणीतरी एखाद्या मुद्द्यावरुन नाराज असेल, त्यामुळे माझ्यावर हल्ला केला असावा. घटनास्थळी पोलिसांनी आवश्यक तेवढी सुरक्षा व्यवस्था ठेवली नव्हती’, असा आरोप रामदास आठवलेंनी केलाय.
महाराष्ट्रात असलेला दलित समाज हा राजकीय दृष्ट्या जागरूक समाज आहे. ही शक्ती ज्या पक्षाला मतदान करेल त्याची सत्ता राज्यात आणि केंद्रात येते. त्यामुळे या समाजाचा नेता होण्यासाठी दलित नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. रामदास आठवले हे दलित समाजातल्या तळागाळातून आलेले लोकप्रिय नेते आहेत. केंद्रीय मंत्री असल्याने त्यांचं राजकीय वजन वाढलेलं आहे.
दुसरीकडे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमयोबत युती केली आहे. दलित आणि मुस्लीम मतदारांच्या एकीवर राज्यात पर्याय देण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न आहे. मात्र या दोन्ही नेत्यांमधला सुप्त संघर्ष आता हिंसक वळणावर पोहचू लागलाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यातच राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलू लागली आहे. प्रकाश आंबेडकर असोत किंवा रामदास आठवले, दोघेही लोकप्रिय नेते आहेत. मात्र मतदार हा आपल्याच पाठीशी मोठ्या संख्येने असावा यासाठी सुरू असलेला संघर्ष हिंसेच्या वळणावर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी राज्यातली शांतता धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यास भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला आहे. “अशा अनेक नेत्यांना मारहाण होते, यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. माझ्यासाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा नाही,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. लातूरमध्ये प्रकाश आंबेडकरांना यावर प्रश्न विचारण्यात आला. पण त्यांनी यावर एक अक्षरही बोलण्यास नकार दिला आणि बोलणं टाळलं.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी रात्री अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाला गेले असता, प्रविण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आठवले प्रमुख पाहुणे होते. यावेळी रामदास आठवले यांनी कार्यक्रमात भाषण केले. त्यानंतर ते स्टेजवरून खाली उतरून गाडीकडे जात असताना प्रविण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केली. आठवलेंना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आठवलेंच्या समर्थकांनी पकडलं आणि चांगलाच चोप दिला.
कोण आहे प्रविण गोसावी?
या प्रकरणानंतर आरोपी प्रविण गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तो एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. मात्र त्याने असे का केले, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या :