उस्मानाबाद : स्वतंत्र विदर्भाच्या (Vidarbha) चळवळीने मध्यंतरी बाळसे धरले. नागपूरसह विदर्भात विदर्भवाद्यांची स्वातंत्र्यासाठी आंदोलन होतात. पण स्वतंत्र मराठवाड्याविषयी (Marathwada) अद्यापही मोठे जनमत दिसून येत नाही. अधून-मधून स्वातंत्र्याची चर्चा होते, पण गाडं काही पुढे सरकत नाही. आता विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी स्वतंत्र मराठवाड्याचा बिगूल वाजविला आहे. त्यावर शिवसेनेची खणखणीत प्रतिक्रिया ही आली आहे.
सदावर्ते यांनी मराठवाड्यासह विदर्भ अशी दोन राज्य होण्यासाठी एल्गार पुकारला आहे. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी संवाद परिषदही बोलावली आहे. अर्थात त्यांच्या या भूमिकेला मराठवाड्यातून कितपत पाठबळ मिळते हे लवकरच स्पष्ट होईल.
पण स्वतंत्र मराठवाडा, विदर्भाबाबत शिवसेनेने त्यांच्या भूमिकेशी कसलीही तडजोड केलेली नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदावर्ते यांच्या भूमिकेवर भाष्य न करता, स्वतंत्र मराठवाड्याला विरोध केला आहे.
“अन्याय झाला म्हणून,आपला प्रांतच तोडणे शिवसेनेला मान्य नाही”, असे खणखणीत उत्तर त्यांनी दिलं. निजामाच्या जुलमी राजवटीतून, संघर्ष करुन मराठवाडा स्वतंत्र झाला आहे. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रात सहभागी झाला, याची त्यांनी आठवण करुन दिली.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. पण अनुशेष शिल्लक आहे म्हणून स्वतंत्र राज्य निर्मितीला शिवसेनेचा विरोध असल्याची स्पष्ट भूमिका दानवे यांनी मांडली. विकासाच्या मुद्यावर स्वतंत्र राज्य निर्मितीला त्यांनी विरोध केला.
फुटीनंतरही मराठवाड्यात दोन्ही गटांची ताकद आहे. स्वतंत्र राज्याविषयी दानवे यांनी भूमिका जाहीर केल्याने स्वतंत्र मराठवाड्याच्या आंदोलनाला कोणताही राजकीय पक्ष आता पाठिंबा देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.