मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या 224 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल मानली जात आहे. निवडणूक कर्नाटकमध्ये होणार असली तरी त्याचे देशात वारे वाहू लागले आहेत. मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेने याच कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव केला होता. कर्नाटक सरकारने सोलापूर जिल्ह्यात कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा केली. तसेच, सांगली, जत येथील गावांवरही कर्नाटक सरकारचा दावा सांगितला होता. तर त्याही पुढे जात कर्नाटकने पुन्हा एकदा महाराष्ट्राची कुरापत काढली आहे. त्यामुळे आता कर्नाटक येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्राने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील जनतेला 54 कोटी इतका आरोग्य निधी जाहीर केला आहे. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा निधी रोखण्याची घोषणा केली. त्यामुळे सरकारने याचे चोख उत्तर देण्याची मागणी करतानाच विधान परिषदेने दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करून कर्नाटक सरकारचा निषेध केला होता.
राज्यसरकारने महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिक गावांतील नागरिकांचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार आता बेळगांव, कारवार, कलबुर्गी व विदर जिल्हयांतील 12 तहसीलमधील 865 गावांतील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गटातील कुटुंबे आणि अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समावेश करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत भविष्यात लाभार्थ्यांचे काही निकष बदलल्यास तसेच इतर काही बदल झाल्यास ते बदल महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील लाभार्थी कुटुंबांना लागू राहणार आहेत. या नागरिकांना हा लाभ देण्याकरिता कर्नाटक राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांने निर्गमित केलेली शिधापत्रिका, आधार कार्ड तपासण्यात येईल.
शिधापत्रिका, आधार कार्ड द्वारे त्याच्या निवासाची खात्री केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला राज्य आरोग्य हमी सोसायटीने ठरवलेल्या मसुद्यानुसार कुटुंबाच्या सदस्याचे स्व-घोषणा पत्र बंधनकारक असणार आहे. सादर योजनेंतर्गत प्रति कुटुंब / प्रति वर्ष 1.5 लक्ष रकमेचे ( मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतिवर्ष 2.50 लाख ) विमा सरंक्षण रक्कम आणि 34 तज्ञसेवामधील 996 उपचारांचा लाभ घेता येणार आहे.
सीमा भागातील 865 गावांतील कुटुंबांना महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय / खाजगी अंगीकृत रुग्णालयांमधून ( बेळगाव येथील के.एल.इ. हॉस्पिटल आणि पणजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह ) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सध्या अंगीकृत असलेल्या 1000 रूग्णालयांव्यतिरिक्त अतिरिक्त 140 रुग्णालये कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये अंगीकृत करण्यास आणि 10 मराठी भाषिक असणारी रुग्णालये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगांव, कारवार, कलबुर्गी, विदर या मराठी भाषिक जिल्ह्यांमध्ये अंगीकृत करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.