अहमदनगर : (Gopichand Padalkar) भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे कायम चर्चेत असतात ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील टीकेवरुन. मात्र, हीच टीका अनेकांना झोंबली जात असल्याने आता ते देखील माझ्यावर वेगवेगळे आरोप करीत असल्याचे म्हणत त्यांनी (Nilesh Lanke) आ. निलेश लंके यांच्यावर टीका केली आहे. लंकेची लंका जाळायला अनेकजण तयार आहेत. त्यामुळे ज्याने-त्याने हिशोबात राहून आरोप करणे गरजेचे आहे. शिवाय असे आरोप करणाऱ्यांना आपण किंमतच देत नाही आणि पवार सोडून आपण टीका करण्यासाठीही खाली येत नसल्याचे पडळकर म्हणाले आहे. जिल्ह्यातील पारनेर येथील ढवपुरी येथे झालेल्या सभेत (BJP Party) भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केलीये. तर यावरुच आता या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची पारनेरातील ढवपुरी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी आ. निलेश लंके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. रावणाची लंका ही एका हनुमानाने जाळली. तर या लंकेची लंका जाळायला येथे बरेच लोक आहेत. अशी खरमरीत टीका केल्यानंतर आ. लंके यांनीही जशाच तसे उत्तर दिले आहे. ज्यांनी मतदारसंघात आपले डिपॉझिट जप्त झाले आहे त्यांनी आगोदर मतदारसंघात लक्ष द्यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. एवढेच नाहीतर त्यांचे खापराचे तोंड असते तर मागेच फुटले असते असेही लंके म्हणाले आहेत.
चौंडी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी आहे. मध्यंतरी येथेच राजकारण केल्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे तर अवघ्या 20 दिवसांमध्ये सत्तेतून पायउचार व्हावे लागले, एवढेच नाहीतर मी चौंडीत आल्यावर त्यांना पळून जावे लागले असल्याची आठवणही पडळकर यांनी करुन दिली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि आ. निलेश लंके यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असले तरी त्याला निमित्त मात्र, शरद पवारांचेच आहे.
राज्यात जातीय राजकारण ज्यांनी केले त्यांच्यावरच आपण सातत्याने टीका केली आहे. त्यामुळेच आता इतर राष्ट्रवादीचे नेतेही आपल्यालाच लक्ष करीत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. असे असले तरी आरोप करणाऱ्यांना आपण किंमतच देत नाही आणि पवार सोडून आपण टीका करण्यासाठीही खाली येत नाही हे देखील त्यांनी सांगितले आहे.
उठ-सूट आरोप करण्यासाठीच काहीजणांना पक्षाने सांभळले आहे, त्यापैकी एक म्हणजे पडळकर.. मतदारसंघात आपले डिपॉझिट जप्त होते आणि आरोप मात्र, शरद पवार यांच्यावर करतात. त्यामुळे अशा आरोपांचा ना जनतेवर परिणाम होतो ना त्या व्यक्तिमत्वावर, उलट त्यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर द्यायचे म्हणजे आपला वेळ वाया घालवल्यासारखे असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.