लग्नमंडपात फडणवीसांशी काय चर्चा झाली, माढ्यातील प्रश्नाचं उत्तर अजित पवारांनी बारामतीत दिलं!
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar and Devendra Fadnavis together) हे सत्तानाट्यानंतर काल पहिल्यांदाच एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं.
बारामती : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar and Devendra Fadnavis together) हे सत्तानाट्यानंतर काल पहिल्यांदाच एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातील माढा इथं एका शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी हजेरी(Ajit pawar and Devendra Fadnavis together) लावली. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त दोघेही एकत्र आले. सत्तानाट्यानंतर दोघेही एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं.
हे दोघेही मंचावर शेजारी-शेजारी बसले होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अजित पवारांनी आज बारामतीत याचं उत्तर दिलं. अजित पवार हे आज बारामतीत आहेत. बारामतीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. यावेळी त्यांना माढ्यात देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा झाली, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावेळी अजित पवार म्हणाले, “संजयमामा शिंदेंच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी होत. त्यावेळी त्यांना मी हवा पाण्याबद्दल विचारलं”
बारामती माझी, मी बारामतीचा
बारामती माझी आहे, माझ्या बारामतीकरांनी मला प्रचंड मतांनी निवडून दिलं आहे. मला बारामतीकर महत्वाचे आहेत. त्यांची कामं मला करायची आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.
सिंचन घोटाळ्यात क्लीनचीट मिळाल्याच्या विषयावर मी बोलणार नाही. मंत्रिमंडळात खाते वाटपाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबद्दल मला विचारू नका, असं म्हणत त्यांनी खातेवाटपावर बोलणं टाळलं.
उपमुख्यमंत्रिपद ही कार्यकर्त्यांची इच्छा
अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील खातेवाटप कधी होणार, कोणत्या मंत्र्याला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत उत्सुकता आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले विराजमान झाले आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपदी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्याबाबतच अजित पवारांना आज विचारण्यात आलं.
अजित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांना वाटतं मला उपमुख्यमंत्री करावं, पण ते ठरवण्याचा निर्णय हा त्या त्या पक्षप्रमुखांचा आहे”