मोहिते-पाटील, पिचड, क्षीरसागर ते सोपल, राष्ट्रवादी सोडलेले दिग्गज नेते आता काय करणार?
NCP Mega Bharti : शरद पवारांनी महाविकास आघाडीची स्थापना करुन महाराष्ट्राच्या राजकारणालाच कलाटणी दिली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी दोन दिवसापूर्वीच पुन्हा एकदा ‘मेगाभरती’ करण्याची घोषणा केली. त्याची प्रचिती हळूहळू येऊ लागली आहे. नुकतंच जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे (Rajiv Awale NCP) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले कल्याणराव काळे दिसले. पंढरपुरातील एका कार्यक्रमात कल्याणराव काळे (Kalyan Kale) यांनी पवार सांगतील त्या पद्धतीने काम करु असं म्हटलं. त्यामुळे कल्याण काळे येत्या काळात राष्ट्रवादीत दिसले तर आश्चर्य वाटायला नको. (NCP Mega Bharti)
कल्याण काळे तो झांकी है, अशा पद्धतीने सध्या राष्ट्रवादीचे नेते वावरत आहेत. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरश: भगदाड पडलं. मधुकर पिचडांसारखे स्थापनेपासूनचे बुरुज ढासळले. इतकंच काय तर राणा जगजितसिंह पाटील यासारख्या नात्यातल्या माणसांनीही साथ सोडली. विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर, दिलीप सोपल यासारखे राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदारही पवारांना सोडून भाजप-शिवसेनेत गेले.
विधानसभेचं प्लॅनिंग फसलं?
मोदी लाट आणि भाजपचं वारं त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अनेकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप-शिवसेनेला जवळ केलं. मात्र पवारांनी महाविकास आघाडीची स्थापना करुन महाराष्ट्राच्या राजकारणालाच कलाटणी दिली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर त्यांचा निर्णय बूमरँग झाला.
दिग्गजांचा पराभव
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी पक्षाला रामराम करुन पवारांची साथ सोडली. मात्र विधानसभा निवडणुकीत या दिग्गजांना शरद पवारांनी धक्का दिला. शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या बहुतांश आमदारांना जनतेने नाकारल्याचं चित्र पाहायाला मिळालं. (MLAs who left NCP Sharad Pawar) कारण राष्ट्रवादी सोडलेल्या सात आमदारांपैकी केवळ दोघांना निवडणुकीत यश आलं, तर पाच जणांना पराभव स्वीकारावा लागला.
राणा जगजितसिंह पाटील, भास्कर जाधव या दोघा आमदारांनाच विजय मिळवता आला आहे. दिलीप सोपल, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा यांना पराभवाचा धक्का बसला.
वाचा : जेव्हा शरद पवारांची साथ सोडलेले 52 आमदार पुढच्या निवडणुकीत पडले!
जयदत्त क्षीरसागर यांची लढत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याशी होती, तर शेखर गोरे हे सख्खा भाऊ जयकुमार गोरेला भिडले होते. या दोघांनाही पराभवाची चव चाखावी लागली.
राष्ट्रवादी सोडून गेलेले दिग्गज नेते
- मधुकर पिचड -राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
- वैभव पिचड -राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
- राणा जगजितसिंह पाटील -राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
- भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना
- जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना
- पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना
- दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना
- शेखर गोरे – राष्ट्रवादी ते शिवसेना
- बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप
- धनंजय महाडिक – राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
- उदयनराजे भोसले – राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
- शिवेंद्रराजे भोसले – राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
- चित्रा वाघ – राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
- संदीप नाईक नगरसेवकांसह भाजपात
- गणेश नाईक
राष्ट्रवादी सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांचा विधानसभेचा निकाल
- भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरी – विजयी
- जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड – पराभूत
- पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे – पराभूत
- दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत
- रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर – पराभूत
- शेखर गोरे – (आमदार नाही) राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा – पराभूत
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार
- राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद – विजयी
- बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर – विजयी
- वैभव पिचड – राष्ट्रवादी ते भाजप – अकोले, अहमदनगर – पराभूत
- नमिता मुंदडा – (आमदार नव्हत्या) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड – विजयी
नमिता मुंदडा यांच्याविषयी फारच रंजक गोष्ट घडली. शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचा झेंडा हाती धरला. त्या याआधी आमदार नव्हत्या. परंतु भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या.
तीन महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार
- सदाशिव पाटील – काँग्रेस – (खानापूर आटपाडी, सांगली) (फेब्रुवारी 2020)
- उदेसिंग पाडवी – भाजप (शहादा, नंदुरबार) (9 सप्टेंबर 2020)
- सीताराम घनदाट (घनदाट मामा) – अपक्ष (गंगाखेड, परभणी) (16 सप्टेंबर 2020)
- रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस – (चिपळूण, रत्नागिरी) (30 सप्टेंबर 2020)
- एकनाथ खडसे – भाजप (मुक्ताईनगर, जळगाव) 23 ऑक्टोबर 2020
- राजीव आवळे – जनसुराज्य – (हातकणंगले, कोल्हापूर) 16 डिसेंबर 2020
राष्ट्रवादीची मेगाभरती
“भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. जयंत पाटील यांनी हे विधान करुन राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांसाठी आपली दारं पुन्हा उघडी असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.
“गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, त्यांना तिथे उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल”, असं जयंत पाटलांनी म्हटलं.
भाजप सोडून परत या, अजित पवारांची साद
एकीकडे जयंत पाटलांनी मेगाभरतीची घोषणा केली, तर दुसरीकडे अजित पवारांनीही थेट नेत्यांना साद घालून, राष्ट्रवादीत परत येण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अजित पवार, जयंत पाटील यांच्या या आवाहनानंतर आता राष्ट्रवादीतून गेलेले दिग्गज नेते आता कोणता निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(leaders who left NCP and Sharad Pawar)
संबंधित बातम्या
शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?
पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादीला न पचवता येणारे पाच धक्के
राष्ट्रवादीचा धमाका, अवघ्या दोन महिन्यात तब्बल पाच माजी आमदारांच्या हाती घड्याळ