शिवसेनेच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतरही राष्ट्रवादीकडून ‘पारनेर पॅटर्न’ची पुनरावृत्ती; आता उद्धव ठाकरे काय करणार?
सोलापुरात महेश कोठे बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याने तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. | CM Uddhav Thackeray
सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे (Mahesh Kothe) हे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddha Thackeray) कशाप्रकारे व्यक्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Solapur Shivsena leader Mahesh Kothe will join NCP in presence of Sharad Pawar)
यापूर्वी अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. तेव्हादेखील अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते.
यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अजित पवार यांना फोन करून निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना धाडला होता. अखेर या बंडखोर नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर येऊन हातात पुन्हा शिवबंधन बांधले होते.
मात्र, सोलापुरात महेश कोठे बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याने तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. आपल्या नेतृत्वाखाली सोलापुरात शिवसेनेची ताकद वाढली. मात्र, विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पत्ता कट झाल्यामुळे कोठे नाराज होते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीत जायचे असा निर्धार केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत महेश कोठे?
* महेश कोठे सध्या सोलापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत * आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक * सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव * 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली. * 2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. * महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा
संबंधित बातम्या:
निलेश लंकेंनी राष्ट्रवादीत आणलं, मिलिंद नार्वेकरांनी ‘करुन दाखवलं’, पारनेरच्या नगरसेवकांची घरवापसी
सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप
‘एमआयएम’नंतर आता राष्ट्रवादीचा शिवसेनेलाही धक्का; सोलापुरातील हा बडा नेता ‘घड्याळ’ बांधणार
(Solapur Shivsena leader Mahesh Kothe will join NCP in presence of Sharad Pawar)