मुंबई: शिवसेनेतील बंडाला आज चार दिवस होत आहेत. या चार दिवसात अनेक प्रयत्न करूनही बंडखोर माघारी फिरायला तयार नाहीत. उलट रोज दोन चार, दोन चार आमदार एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना जाऊन मिळत आहेत. एकनाथ शिंदे हेच आपले नेता असून ते सांगतील तेच आम्ही करणार असल्याचं या आमदारांनी म्हटलं आहे. या काळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याशी चर्चा केली. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्याच पाठी आहोत, अशी ग्वाही दिली आहे. आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे (ncp) नेते मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जाऊन भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच पुढे काय करायचं याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 6.30 वाजता मातोश्रीवर जाऊन शरद पवार, खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे आम्ही भेट घेणार आहोत. जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे याबाबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधीमंडळाचे जे काही कामकाज आहे त्याबद्दलचा निर्णय विधानमंडळाचे अध्यक्ष घेतील. कारण त्यामध्ये सरकार म्हणून बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार माघारी फिरण्यासाठी तयार नसल्याने आता आघाडीसमोर काय पर्याय असणार आहेत याचा घेतलेला हा आढावा.
ठाकरे सरकारकडे अजूनही काही पर्याय उरलेले आहेत. त्यापैकी शिंदे गटातील जास्तीत आमदारांना निलंबित करण्यावर भर देणं हा एक आहे. आधीच शिवसेनेने 17 आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जेवढे जास्त आमदार निलंबित होतील, त्याआधारे सरकार बरखास्त करणं शक्य होऊन मध्यावधीला सामोरे जाता येईल.
उद्धव ठाकरे यांच्यासमोर दुसरा पर्याय आहे. तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलं आहे. त्यामुळे ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगितलं जात आहे. आज चौथ्या दिवशीही आमदार परत येत नाहीत. उलट आहे ते आमदार शिंदे गटाला जाऊन मिळत असल्याने आमदारांचा आकडा कमी होत आहे. त्यामुळे राजीनामा देणे हा उद्धव ठाकरेंकडे एक पर्याय आहे.
शिंदे यांच्या गटाने राज्यपालांना त्यांच्या गटाचं पत्रं दिलं तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करायला सांगतील. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील. त्यावेळी चित्रं पालटू शकतं. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायला तरी मिळते का? याकडे आघाडीचं लक्ष लागलं आहे.
आघाडीकडे एक पर्याय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन विरोधी पक्षात बसणं. संख्याबळ हाती नसताना विश्नासदर्शक ठरावाला सामोरे न जाता थेट राजीनामा द्यावा. म्हणजे नामुष्की टळेल. शिवाय ज्या आमदारांनी बंड केलं ते व्हिलन ठरतील. त्याची सहानुभूती ठाकरे कुटुंबाला कायम राहील. त्यामुळे राजीनामा देऊन विरोधी पक्षात बसणं हा एक पर्याय आघाडीकडे आहे.
आघाडीकडे आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे सरकार बरखास्तीचा कॅबिनेटमध्ये ठराव करणं. त्यानंतर हा प्रस्ताव विधानसभेच्या उपसभापतींना देऊन राज्यपालांना विधानसभा बरखास्तीची शिफारस करणं. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. मात्र, कॅबिनेटचे निर्णय राज्यपालांना बंधनकारक असलं तरी मायनॉरिटीतील सरकारची शिफारस राज्यपाल किती स्वीकारतील याबाबत शंका आहे.