शिवसेना की भाजप, कोण खोटं बोलतंय? लोकसभेपूर्वी कोणता फॉर्म्युला ठरला?
शिवसेनेच्या मते, “लोकसभेवेळी युती करताना विधानसभेचाही फॉर्म्युला ठरला होता. पद आणि जबाबदाऱ्या सम-समान असतील असं अमित शाह यांच्यासमोरच ठरलं होतं”.
मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला (BJP Shiv Sena formula) ठरला नव्हता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे सेना-भाजपमधील (BJP Shiv Sena formula) तणाव वाढण्याची चिन्हं आहेत. कारण शिवसेनाही सातत्याने 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे. मात्र पुढील 5 वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
शिवसेनेच्या मते, “लोकसभेवेळी युती करताना विधानसभेचाही फॉर्म्युला ठरला होता. पद आणि जबाबदाऱ्या सम-समान असतील असं अमित शाह यांच्यासमोरच ठरलं होतं”.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला (BJP Shiv Sena formula) आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही (BJP Shiv Sena formula) ठरला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.
मुख्यमंत्री आज काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. शिवसेनेला 5 वर्षांसाठी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद असावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे, असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी लगावला.
लोकसभेवेळी शिवसेना-भाजपमध्ये कोणता फॉर्म्युला ठरला?
लोकसभा निवडणुकीवेळी 18 फेब्रुवारी 2019 रोजी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यावेळी लोकसभेला शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
दुसरी अट म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जातील असं ठरलं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल, त्यामुळे पद आणि जबाबदाऱ्या यांचंही समान वाटप होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.