विधानसभा सभागृहात अजितदादांचे सख्खे शेजारी कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?
साधारणतः विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये मंत्री, सदस्य यांची आसन व्यवस्था ही ज्येष्ठत्वानुसार ठरविण्यात येते. राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री पदे झाल्यामुळे त्यांची सभागृहात आसन व्यवस्था कशी असेल याचा विचार विधानसभा अध्यक्षांना करावा लागणार आहे.
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात अनेक महत्वाचे मुद्दे गाजणार आहेत. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून या अधिवेशनात घमासान होणार आहे. तर, अजित पवार यांच्या बंडामुळे खरी राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्यामुळे विद्यमान स्थितीत जास्त संख्याबळ असल्याचा दावा करत विरोधी पक्षनेते आपल्याला मिळावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. या पदासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. याचसोबत राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री पदे झाल्यामुळे त्यांची सभागृहात आसन व्यवस्था कशी असेल याचाही विचार विधानसभा अध्यक्षांना करावा लागणार आहे.
साधारणतः विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये मंत्री, सदस्य यांची आसन व्यवस्था ही ज्येष्ठत्वानुसार ठरविण्यात येते. सत्ताधारी पक्षाकडील रांगेत पहिल्या रांगेत पहिली खुर्ची ही मुख्यमंत्री यांची तर त्यांच्या बाजूची जागा उपमुख्यमंत्री यांच्यासाठी राखीव असते. त्यांच्यामागे मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्री आणि शेजारच्या रांगेत अन्य मंत्री यांना जागा दिली जाते.
विरोधी पक्षाकडील रांगेत पहिली खुर्ची ही विधानसभेत उपाध्यक्ष आणि विधान परिषदेत उपसभापती यांची असते. त्यांच्या बाजूला विरोधी पक्षनेते विराजमान होतात. त्यांनतर अनुक्रमे पक्ष गटनेते, प्रतोद यांची अशी आसन व्यवस्था असते.
अजित पवार यांची जागा कुठे ?
अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच दुसरा उपमुख्यमंत्री मिळाला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान होत असत. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांचे शेजारी कोण होणार याची उत्सुकता आहे.
अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा निश्चितच वरिष्ठ आहेत. पाच वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषविले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूला बसण्याची संधी त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे.
भाजपचे मंत्री मागच्या रांगेत
राष्ट्रवादी मंत्र्याच्या तुलनेत भाजपचे आणि शिंदे गटाचे मंत्री नवखे आहेत. छगन भुजबळ हे माजी उपमुख्यमंत्री आहेतच शिवाय अनेक वर्ष ते विविध खात्याचे मंत्री होते. मंत्रिपदाचा सर्वाधिक अनुभव असणारे भुजबळ हे एकमेव नेते आहेत. त्यांच्या खालोखाल माजी विधानसभा अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा नंबर आहे. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे ही माजी मंत्री आहेत.
राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांमुळे यापूर्वी सभागृहात पहिल्या रांगेत मानाचे पान मिळविणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांना आता मात्र दुसऱ्या रांगेत बसावे लागणार आहे. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ मंत्री भुजबळ, वळसे पाटील यांच्या बाजूला असतील. मात्र, इतर मंत्री हे दुसऱ्या तर शिंदे गटाचे मंत्री यांना मात्र तिसऱ्या रांगेत स्थान मिळेल अशी शक्यता आहे.