तेलंगणा | 5 डिसेंबर 2023 : तेलंगणा राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आता संपली आहे. तेलंगणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसची सत्ता आली आहे. कॉंग्रेसने 119 मतदारसंघांपैकी 64 जागा जिंकल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याबाबत चित्र स्पष्ट होत नव्हते. मुख्यमंत्री कोण? यावरून सुरू असलेल्या सस्पेंसमध्ये काँग्रेसने एक खळबळजनक निर्णय घेतला. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून दिल्ली हायकमांडने रेवंत रेड्डी यांच्या नावाला पसंती दिली आहे. तशी अधिकृत घोषणा कॉंग्रेसने केली आहे. गुरुवारी 7 डिसेंबर रोजी रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली कॉंग्रेसने तेलंगणामध्ये निवडणुका लढली होती. रेवंत रेड्डी यांनी बहुमातापेक्षा अधिक जागा जिंकून कॉंग्रेसला सत्तेची दारे उघडी केली. त्यामुळेच त्यांच्या नावाला कॉंग्रेस हायकमांडने पसंती दिली. गुरुवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते उत्तम कुमार रेड्डी आणि भट्टी विक्रमार्क यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला होता. मात्र, हायकमांडने त्यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा चांगला पोर्टफोलिओ देण्यास सांगितले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच, रोटेशनल सीएम यासारखा कोणत्याही फॉर्म्युल्या करण्यात येणार नाही असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे कर्नाटकानंतर काँग्रेसचे सरकार असलेले तेलंगणा हे दक्षिणेतील दुसरे राज्य ठरले. रेवंत रेड्डी हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. निवडणुक प्रचारादरम्यान ते नेहमीच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत दिसत होते. तेलंगणातील विजयाचे सर्वाधिक श्रेय रेवंत रेड्डी यांनाच जाते. त्यामुळेच त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर राहिले.
2019 मध्ये मोदी लाटेत तेलंगणामध्ये काँग्रेसचे तीन लोकसभा खासदार निवडून आले त्यापैकी एक रेवंत रेड्डी आहेत. अभाविपमधून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु, काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखविला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरीतून तिकीट दिले. येथून ते विजयी झाले. 2021 मध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी दिली.