Uday Samant : शिंदे-ठाकरेंचं जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? उदय सामंत यांचा पत्रातून थेट निशाणा
उदय सामंत यांच्या पत्रात अनेक मुद्दे नमुद करण्यात आले आहेत. या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली आहे. दरम्यान, शिंदे-ठाकरेंचं जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? हा निशाणा देखील पत्रातून सोडण्यात आलाय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाने शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे गटाच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि शिवसेना पक्षप्रमुखांवर मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ आली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद पत्राच्या माध्यमातून घातली होती. यावेळी त्यांनी पत्रात निष्ठेसंदर्भातही भाष्य केलं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पत्रानंतर आता बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसैनिकांना पत्र लिहिलंय. विशेष म्हणजे या पत्रात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि वाघाचा फोटो आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या फोटोला उदय सामंत यांच्या पत्रात कुठेही स्थान नसल्याचं दिसतंय. उदय सामंत यांच्या पत्रात अनेक मुद्दे नमुद करण्यात आले आहेत. या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली आहे. दरम्यान, शिंदे-ठाकरेंचं जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? हा निशाणा देखील पत्रातून सोडण्यात आलाय.
उदय सामंत यांचं पत्र
उदय सामंत यांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे
- एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या उदय सामंत यांनी शिवसैनिकांना लिहलेल्या पत्रात अनेक मुद्दे आहेत
- पत्रात फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा आणि वाघाचा फोटो आहे. उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब
- उदय सामंत यांच्या मतदारसंघात निष्ठावंतांच्या शिवसैनिकांच्या झालेल्या मेळाव्यानंतर उदय सामंत यांचे पत्रातून उत्तर
- या मेळाव्याला रत्नागिरी मतदार संघातील शिवसैनिक कमी तर राजापूर, लांजा संगमेश्वरमधील जास्त शिवसैनिक
- याच निष्ठावंतांच्या मेळाव्यातील व्यासपीठावरून मला भाषण ऐकवलं गेलं- उदय सामंत यांचा पत्रातून गोप्यस्फोट
- या मेळाव्यात काही मंडळी विनायक राऊत यांच्या पहिल्या दुसऱ्या निवडणुकीत नारायण राणेंच्या आदेशाचे पालन करणारी
- यातील काहींनी राऊत यांच्या प्रचाराची पत्रके देखील गटारात फेकून दिली
- मला कोणावर राग नाही, गद्दार, उपरा म्हणणे मला रुचलेलं नाही- उदय सामंत
- अजूनही मी शिवसैनिकच, ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला
- ज्या व्यक्तींनं बाळासाहेबांची टिंगल केली, महाराष्ट्रात शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर नेलं, या विरोधात हा उठाव
- माझ्या राजकीय कारर्किदीचा विचार न करता मी एकनाथ शिंदे गटात शिवसेना वाचवण्यासाठी सामील झालो
- गुवाहाटीत जाण्यापूर्वी सर्वांना जोडण्याचा प्रयत्न मी केला, ज्यांच्या मध्यस्तीनं मी हा प्रयत्न करत होतो. त्याचे नाव लवकरच जाहीर करेन
- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे जुळू नये म्हणून काम करणारी काही मंडळी शिवसेनेत
- अनैसर्गिक आघाडीच्या विरोधामुळे मी युतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला, बोला यात माझे काय चुकले
- लवकरच भेटू सांगत उदय सामंत यांचे शिवसैनिक आणि मतदारांना भावनिक पत्र
आता उदय सामंत यांच्या पत्रानंतर शिवसेनेकडून काय टीका केली जाते. हे पहावं लागेल.