शिवसेनेच्या डावपेचांमागे ‘या’ दिग्गज रणनीतीकाराचा हात
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या आक्रमकपणे आग्रही भूमिका (Strategist behind Shivsena) घेतल्या त्यावरुन अनेकांना आश्चर्य वाटले.
मुंबई: शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या आक्रमकपणे आग्रही भूमिका (Strategist behind Shivsena) घेतल्या त्यावरुन अनेकांना आश्चर्य वाटले. मागील अनुभवाप्रमाणे शिवसेना अखेरच्या काळात भाजपशी तडजोड करेल आणि युतीचंच सरकार येईन, असंही बोललं गेलं. मात्र, हे सर्व अंदाज चुकीचे ठरवत शिवसेनेने आरपारची लढाई करत भाजपशी काडीमोडी केला. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया वर झाल्या. मात्र, शिवसेनेच्या या रणनीतीमागे (Strategist behind Shivsena) निवडणुकीतील चाणाक्य संबोधले जाणारे प्रशांत किशोर असल्याचं बोललं जात आहे.
प्रशांत किशोर यांच्या निवडणूक रणनीतीचा परिणाम अनेक ठिकाणी पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीतीश कुमार-लालू यादव युती, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि जगन मोहन रेड्डी या सर्वांनाच प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा फायदा झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात किशोर यांची रणनीती म्हणावी अशी यशस्वी झाली नसल्याचाही सूर निघत आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाली आणि त्याचं रुपांतर अखेर राष्ट्रपती राजवटीमध्ये झालं. शिवसेनेने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसारच भाजपशी फारकत घेतल्याचंही बोललं जात आहे. या निर्णयावरुन सोशल मीडियावर प्रशांत किशोर चर्चेत आहेत. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) बंडखोर नेते डॉ. अजय आलोक यांनी याच मुद्द्यावरुन प्रशांत किशोर यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘एक दिग्गज रणनीतीकार आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना त्यांच्याकडून ज्ञान घेत आहे. त्याचे परिणाम सर्वजण पाहात आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना अधिक वेळ दिला नाही. या दिग्गजांनी याकडे लक्षच दिलं नाही असं वाटत आहे. त्यामुळेच त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही.’
दुसरीकडे एक गट असाही आहे जो शिवसेनेच्या आतापर्यंतच्या निर्णयांना धाडसी आणि ठाम म्हणत आहे. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत जागावाटपात अन्याय सहन करावा लागल्याचं उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिकांचं मत आहे. त्यानंतर शिवसेनेने आपल्या मागण्यांवर ठाम राहून भाजपसमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे भाजपचीच कोंडी झाल्याचं या गटाचं मत आहे. संख्याबळ नसतानाही शिवसेना आपला मुख्यमंत्री करण्यात यशस्वी होईल, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे. सध्या तरी त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेची ही रणनीती यशस्वी की अपयशी हे येणारा काळच ठरवणार आहे.
दरम्यान, राज्यात सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेला 24 तासांचा वेळ दिल्यानंतर राज्यपालांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारणा केली. त्यांनाही 24 तास दिले. मात्र, 24 तास होण्याआधीच त्यांनी राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यामुळे आज (12 नोव्हेंबर) सायंकाळपासूनच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु झाली. आता काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.