पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले, विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांवरही केले भाष्य
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा अद्याप रिक्त आहेत. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. राज्यात प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे दोन आमदार निवडून आले. मात्र, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा अद्याप रिक्त आहेत. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. राज्यात प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी पक्षालाही विधानसभेच्या 288 जागांवरील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याचा अधिकार आहे. अखेरीस महायुतीमध्ये जे जागावाटप होईल त्यानुसार उमेदवार दिले जातील असेही अजित पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात विधान परिषदेच्या 12 रिक्त जागा भरण्याबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. त्यावेळी मंत्रिमंडळाने 12 आमदारांच्या नावाची शिफारस राज्यपाल कोश्यारी यांना केली होती. मात्र, त्यांनी ती फाईल मंजूर केली नाही. त्यामुळे त्यावेळी ती यादी तशीच पडून राहिली. मंत्रिमंडळाने दिलेली यादी त्यांनी मंजूर करणे आवश्यक होते. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकारने कोर्टात धाव घेतली आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यानच्या काळात राज्यात सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या जागीही आता नवे राज्यपाल रमेश बैस आले आहेत. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार कुणाला करावे याची यादी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरते. त्यामुळे महायुतीचे सरकार लवकरच 12 आमदारांच्या नावाची यादी राज्यपाल महोदयांना सादर करणार आहे. विधानसभा निवडणूक लागण्याआधीच त्याचा निर्णय घेऊ असे अजित पवार यांनी सांगितले. सध्या विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही त्यामुळे त्या समाजाला संधी देऊ असेही ते म्हणाले.
विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही आमदाराची मते आम्ही फोडली नाही. काही आमदार यांना फक्त विनंती केली होती. मात्र, त्यांना कोणतेही प्रलोभन दाखविले नाही असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत काही नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून संधी देण्यात येईल. त्याचप्रमाणे पुढील विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत. जसे लोकसभा निवडणूक आम्ही मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवू आणि जिंकू. महायुतीचे पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.