VIDEO मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सवाल पुन्हा पुन्हा का विचारला जातोय? प्रश्नही तसाच आहे, सांगा…
ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंना खोचक सवाल केलाय. तुमच्या पक्षातल्या नावातील बाळासाहेब म्हणजे कोण ?
मुंबई : शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, हे नाव मिळालं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाधानही व्यक्त केलं. पण, ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंना खोचक सवाल केलाय. तुमच्या पक्षातल्या नावातील बाळासाहेब म्हणजे कोण ? निवडणूक आयोगाकडून, नावाचं वाटप झालं. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं. आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले. यानंतर सोशल मीडियात पोस्टरबाजी सुरु झाली आहे.
ठाकरे गटाकडून मशाल चिन्हं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचे पोस्टर व्हायरल झाले आहेत. तर, शिंदे गटाला डिवचणारे काही पोस्टरही व्हायरल झाले आहेत.
काही पोस्टरवर तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचा फोटो लावलाय. तर, काही पोस्टरवर वंचितचे बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. या पोस्टरवर बाळासाहेबांची शिवसेना असं देखील लिहिल आहे. याच व्हायरल फोटोवरुन, सामनातूनही शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेशी गद्दारी करुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर सोशल मीडियात मीम्सचा पाऊस पडला आहे.
शिंदे गटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचे नाव मिळाले. भाजपने डाव साधला, अशा प्रकारची इमेज त्यात सर्वात लक्षवेधी ठरली.
गटाला नाव मिळाल्यानंतर आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले. या ट्विटचाही नेटकऱ्यांनी यथेच्छ समाचार घेतला. हे कुठले बाळासाहेब ? बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम ?, असा सवाल करत एका ट्विटर युजरने शिंदे यांची फिरकी घेतली.
ठाकरे गटाचे नेते संजय पवारांनी तर, एकनाथ शिंदेंना, नावासाठी दिलेल्या पर्यायांवरुनच सवाल केलाय. शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे किंवा दिघेंचं नाव का मागितलं नाही ? असं प्रश्न संजय पवार यांनी उपस्थित केलाय.
ठाकरे गटात शिवसेना या नावासह उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पूर्ण नाव आहे. दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळाल्यानं ते समाधानी आहेत. तरी, पक्षाच्या नावात ठाकरे नावाचा संदर्भ नसल्यानं ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न होत आहे.