पुणे विधानसभा पोटनिवडणुकीत कुणाची जीत, कुणाची हार ? काय सांगताहेत राजकीय गणितं

निवडणूक म्हटलं की नाराजी नाट्य हे आलेच. मग तो कोणताही पक्ष असो. भाजप याला काही प्रमाणात अपवाद म्हणता येईल. स्वपक्षात बंडखोरांना समज किंवा अन्य कुठल्या मार्गाने कसे शांत करायचे किंवा बंडखोरी होऊ द्यायची नाही हे भाजपला चांगल्या प्रकारे जमते.

पुणे विधानसभा पोटनिवडणुकीत कुणाची जीत, कुणाची हार ? काय सांगताहेत राजकीय गणितं
PUNE BY ELECTION Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 6:13 PM

सुमित सरनाईक, TV9 मराठी : गेल्या अनेक दिवसापासून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. मात्र, दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजप दोन्हीकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले. त्यामुळे निवडणूक होणारच असे चित्र निर्माण झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने विरोधकांना आवाहन करत होते की निवडणूक बिनविरोध करा. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणत आहेत की राजीव सातव यांच्या निधनानंतर ती निवडणूक बिनविरोध करावी अशी आमची इच्छा होती. त्यावेळी मी स्वतः महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. निवडणूक बिनविरोध करा अशी विनंती केली. पण, आता भाजप फक्त माध्यमातूनच निवडणूक बिनविरोध करा अशी विनंती करत आहे.

दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या या क्रिया प्रतिक्रिया पाहिल्यावर असे लक्षात येते की आता निवडणूक होणारच. राष्ट्रवादीकडून अजित पवार स्वतः निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांनी दोन्ही मतदारसंघात निवडणुकीसंदर्भात चांगली तयारी केल्याचे दिसते. निवडणूक म्हटलं की नाराजी नाट्य हे आलेच. मग तो कोणताही पक्ष असो. भाजप याला काही प्रमाणात अपवाद म्हणता येईल. कारण, स्वपक्षात बंडखोरांना समज किंवा अन्य कुठल्या मार्गाने कसे शांत करायचे किंवा बंडखोरी होऊ द्यायची नाही हे भाजपला चांगल्या प्रकारे जमते.

कसबामध्ये भाजपकडून हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांचा अर्जही दाखल झाला. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केला. पण, धंगेकर यांच्या अर्जानंतर काँग्रेसमधील बंडाळी चव्हाट्यावर आली. काँग्रेसचे पुण्यातील नेते दाभेकर यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. पण, त्यांनी मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आले आणि त्यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला. दुसरीकडे भाजपमध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक दोघेही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शैलेश टिळक यांनी माध्यमासमोर आमच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळायला हवी होती अशी नाराजी बोलून दाखवली. पण, भाजप नेत्यांनी त्वरित ॲक्शन घेत हे नाराजीनाट्य शांत केले. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबाला फोन करून कामाला सुरुवात करा अशी विनंती केली त्यानंतर तत्काळ टिळक कुटुंब प्रचारात सहभागी झाले.

कसब्यात किती उमेदवारांनी अर्ज भरले याची माहिती घेऊ

  • कसब्यात 29 उमेदवारांनी 39 अर्ज भरले तर चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 40 जणांनी 53 उमेदवारी अर्ज भरले
  • कसबा आणि चिंचवड येथे अपक्ष उमेदवारांमुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार
  • 10 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत. यावेळी किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

कसबापेठ मधील उमेदवार

  • भाजपा               – हेमंत रासने
  • काँग्रेस                – रविंद्र धंगेकर
  • काँग्रेस बंडखोर   – बाळासाहेब दाभेकर
  • संभाजी ब्रिगेड     – अविनाश मोहिते
  • आप                    – किरण कदरे
  • हिंदू महासंघ        – आनंद दवे

कसबा मतदारसंघ हा ब्राम्हणांचा असल्याचे मानले जाते. तब्बल पाच वेळा या मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट ( ब्राम्हण ) निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रोहित टिळक ( ब्राम्हण ) यांनाच मैदानात उतरवले जात होते. गिरीश बापट हे खासदारकीला उभे राहिले त्यानंतर हा मतदारसंघ कोण लढवणार याची चर्चा सुरू झाली. बापट यांच्यानंतरही कसबा मतदारसंघ ब्राह्मण उमेदवारांच्या हाती असावा अशी रचना होती. त्यामुळेच पुण्याच्या तत्कालीन महापौर आणि दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे नाव पुढे आले. भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या.

ब्राह्मण समाज नाराज

मुक्ता टिळक यांचे निधन झाले, पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे ब्राह्मणांच्या या मतदारसंघात ब्राह्मणच उमेदवार दिला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने तसे न करता यावेळी ओबीसी कार्ड बाहेर काढले. ओबीसी समाजाचे राक्षे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या या निर्णयाला थोड्या फार प्रमाणात विरोधी झाल्याचे पहायला मिळाले. कारण, कसबा येथे ब्राह्मण समाजाकडून एक पोस्टर लावण्यात आले. त्यामध्ये ब्राह्मण नाराज असल्याचे बोलले गेले. (भाजपने त्याकडे दुर्लक्ष करत ओबीसी समाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. कारण, भाजपने कसब्यातून सर्वे केल्याचा समजते. त्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या संदर्भात फार काही सहानुभूती असल्याचे समोर आले नाही. त्यामुळे भाजपने ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे)

कसब्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत

दुसरीकडे काँग्रेसनेही सावध भूमिका घेत आधी भाजपला आपला उमेदवार घोषित करू दिला. त्यानंतरच त्यांनी उमेदवार दिला. कारण, भाजपने ब्राह्मण उमेदवार दिल्यास कॉंग्रेसनेही ब्राम्हण उमेदवार देण्याची तयारी केली होती. भाजपने शैलेश किंवा कुणाल टिळक यांना उमेदवारी दिली असती तर काँग्रेसने रोहित टिळक यांना मैदानात उतरवून ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण अशी लढत घडवून आणण्याची तयारी कॉंग्रेसने केली होती. पण, भाजपने ओबीसी उमेदवार दिला त्यामुळे काँग्रेसने सावध पवित्रा घेत ओबीसी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले. त्यामुळे आता कसब्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार आहे.

कसबा हा ब्राह्मण समाज जास्त असणारा मतदारसंघ आहे का ?

कसब पेठेत आत्तापर्यंत ब्राह्मणांनी विधानसभेत नेतृत्व केले. मात्र, कसबा येथील एकूण स्थिती बघितली तर कसबा खरंच ब्राह्मण मतदार जास्त असलेला मतदारसंघ आहे का ? असा प्रश्न पडतो. या मतदारसंघात जातीनिहाय गणित बघितले तर

समाज                               टक्के                        मतदार

  • ब्राह्मण                          13 टक्के                    –  36 हजार 494
  • मराठा व कुणबी            23. 75 टक्के            – 65 हजार 690
  • इतर मागासवर्ग             31.45 टक्के             – 86 हजार 322
  • अनुसूचित जाती             9.67 टक्के              – 26 हजार 634
  • अनुसूचित जमाती          4.17 टक्के               – 11 हजार 485
  • मुस्लिम आणि जैन         17 टक्के                   – 50 हजार

वरील आकडेवारी एका सर्व्हेतून समोर आली आहे. यानुसार ब्राह्मण वगळता कसब्यामध्ये मराठा आणि कुणबी समाजाचे मतदान अधिक आहे. त्यामुळेच भाजपने येथे ओबीसी उमेदवार देण्याचे ठरवले असेल?

चिंचवडमध्ये कोण याचा सस्पेन्स

कसबा मतदारसंघात उमेदवारीवरून एवढ्या घडामोडी होत असताना दुसरीकडे मात्र चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार का ? किंवा दुसऱ्या उमेदवाराला मैदानात उतरवले जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. स्वतः देवेंद्र फडणवीस यात जातीने लक्ष घालून होते. शेवटी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांचे नाव चर्चेत होते. अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शंकर जगताप हे नाराज असल्याच्या बातम्या आणि चर्चा झाली. मात्र, भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी कोणतेही बंड किंवा नाराजी नाट्य रंगू दिले नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार ठरत नव्हता. अजित पवार यांच्याकडून नाना काटे आणि राहुल कलाटे अशी दोन नावे चर्चेत होती. अर्ज दाखल करायला काही अवधी शिल्लक असताना अजितदादांनी नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी अपक्ष म्हणून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले.

राहुल कलाटे हे जुने शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चिंचवडमध्ये मात्र मराठा विरुद्ध मराठा अशी लढत होताना दिसते. कारण भाजपच्या अश्विनी जगताप या मराठा समाजाच्या आहेत तर राष्ट्रवादीचे नाना काटे सुद्धा मराठा समाजाचे आहेत. दुसरीकडे अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ते ही मराठा समाजाचेच आहेत. त्यांनी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मात्र चिंचवडमध्ये मराठा विरुद्ध मराठा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

चिंचवडमध्ये किती उमेदवार ?

  • चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत
  • अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 26 जणांनी अर्ज दाखल केले.
  • या अर्जांची 8 फेब्रुवारीला छाननी होणार आहे. तर, 10 फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
  • चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारीपासून अर्ज वाटप सुरु झाले.
  • आजपर्यंत 128 जणांनी 231 अर्ज नेले. त्यापैकी 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत.

यामधील आता किती जणांचे अर्ज छाननीत बाद होतात. किती उमेदवार मागे घेतात आणि प्रत्यक्षात निवडणुकीत किती उमेदवार राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपकडून अश्विनी जगताप, भाजपचे पर्यायी उमेदवार म्हणून शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला आहे. पण, त्यांनी एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांचा अपक्ष अर्ज राहील

वरील सगळा आढावा बघता 10 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. आता किती उमेदवार आपले अर्ज माघारी घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही उमेदवारांना सामना करावा लागत आहे सध्याचे चित्र एकंदरीत असे आहे. त्यामुळे कसब्यातून काँग्रेसचे दाभेकर आणि चिंचवड मधून राहुल कलाटे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे. कसब्यामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी तर चिंचवड मध्ये मराठा विरुद्ध मराठा अशी लढत होईल सध्या तरी असे चित्र आहे. भाजप ज्याप्रमाणे निवडणूक बिनविरोध करा असे आवाहन विरोधकांना करत आहे त्याकडे बघता दहा तारखेला विरोधक आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करतात का हे ही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे…

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...