आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांचा खर्च कोणी केला?; नरेश म्हस्के यांचा सवाल
मातोश्रीत पैसे गोळा कोण करत होते. कुणी किती पैसे आणून दिलेत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करू नका, असंही नरेश म्हस्के यांनी सुनावलं.
ठाणे : शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तुमच्या दौऱ्यांसाठी आणि ब्रँडिंगसाठी गेल्या चार-पाच वर्षात कुणी खर्च केले, असा सवाल म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला. म्हस्के म्हणाले, गेले चार-पाच वर्षे ब्रँडिंगसाठी मित्रांच्या कंपन्यांनी कोट्यवधी खर्च केले. तुमच्या सभा, आदित्य संवाद यात्रा घेण्यात आल्या. त्यासाठी एसी हॉल तयार करण्यात आले. तुम्हाला प्रश्न विचारण्याकरिता सुशिक्षित माणसं आणण्यात आली. हे सगळे इव्हेंट तयार केले त्यासाठी खर्च लागतो ना. तो खर्च कुठून केलात. कशातून केलात. कुठल्या अकाउंटमधून केलाय. हा खर्च कुठल्या अकाउंटमधून दाखवण्यात आला. तुमचे परदेश दौरे यासाठी कुठून खर्च केला, असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. शिवाय रात्रीच्या उद्योगाविषयी बोलत नसल्याचंही ते म्हणाले.
हवेतून पैसे आणले का?
आदित्य ठाकरे आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल. तुम्ही खोके-खोके काय करता. आधी हे जे दौरे तुम्ही केलात. त्याचा खर्च कुठून केलात, हे आधी सांगा. कशातून केलात. तुमच्या कुठल्या कंपन्या आहेत. तुमचा व्यवसाय काय. त्यामुळे कुणावर खोक्यांचा आरोप करता. दौरे आणि ब्रँडिंग या सगळ्या गोष्टी हवेतून निर्माण झाल्या का. मुंबई महापालिकेत काही प्रोजेक्ट केले होते. हवेतील बाष्पापासून पाणी निर्माण करण्याचा. तशा पद्धतीने तुम्ही हवेतून पैसे काढले का, असा प्रश्नही नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.
चंदू आणि नंदू कोण?
मुंबई महापालिकेतील गडगंज पैसा तुम्ही खोक्याच्या माध्यमातून जमा केला आहे. यातून या सर्व गोष्टी केल्या आहेत. मुंबई महापालिकेतील हेरिटेज आहे. मुंबई महापालिकेतील प्रत्येक दगड तुम्हाला विचारतो आहे. कुठं नेऊन ठेवला आमचा या मुंबई महापालिकेतील पैसा. गोरगरिबांच्या कष्टातून मिळवलेला पैसा कुठं गेला याचा हिशोब दगड आणि भिंत विचारत आहे. या मातोश्रीवरचे चंदू आणि नंदू कोण माहिती आहे का? हे आम्हाला सांगायला लावू नका. हे चंदू आणि नंदू कोण आहेत. आमच्याकडंही ही माहिती आहे. मातोश्रीत पैसे गोळा कोण करत होते. कुणी किती पैसे आणून दिलेत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करू नका, असंही नरेश म्हस्के यांनी सुनावलं.