पक्ष कुणी चोरला? काय आहे हिंदुत्व? ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले
ठाण्यात ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर पक्ष कोणी चोरला, असे म्हणत शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.
Thackeray group Target Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह मनसेकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. तसेच अनेक पक्षांचे महाराष्ट्रात विविध दौरेही पाहायला मिळत आहेत. आता ठाण्यात ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर पक्ष कोणी चोरला, असे म्हणत शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी
ठाण्यात अनेक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यासोबतच यावर लिहिलेल्या मजकुराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पक्ष कुणी चोरला, अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
“पक्ष कोणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, काय आहे हिंदुत्व?” अशा आशयाचा बॅनर सध्या ठाण्यात झळकत आहे. तसेच यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअॅपद्वारे कळवा असेही यात नमूद करण्यात आले आहे. या खाली एक व्हॉट्सअॅप नंबरही झळकत असून त्यावर स्कॅनर कोडही देण्यात आला आहे.
ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले
सध्या ठाण्यात झळकत असलेले हे बॅनर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्याकडून लावण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सातत्याने हिंदुत्वाचे विचार ठाकरेंकडे नसल्याने बंड केल्याचे सांगितलं जात होते. तसेच खरी शिवसेना आमची असेही वारंवार सांगण्यात येत आहे. त्यावर आता ठाकरे गटाने जोरदार उत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष चोरणे हे हिंदुत्व नाही अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.