भाऊ की पत्नी? भाजपाचं तिकिट कुणाला? पिंपरीचा नवा पेच, कसब्यात कोण?
पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि पत्नी यापैकी भाजप कुणाला उमेदवारी देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रणजित जाधव, योगेश बोरसे- पुणेः विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) जय-पराजयाचा धुरळा उडत असतानाच पुण्यातील पोटनिवडणुकांच्या (By Election) पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजप असा तगडा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे. या दोन पोट निवडणुकांसाठी भाजपचा उमेदवार नेमका कोण असेल यावरून नवा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडच्या जागेवर निवडणूक होत आहे. या ठिकाणी जगताप यांचे भाऊ आणि पत्नी या दोघांनीही उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. आता भाजप नेमकी कुणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरु आहे.
भाऊ आणि पत्नी, एबी फॉर्म कुणाला?
पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या पाठोपाठ बंधू, शंकर जगतापांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपाकडून दोघांची नावे उमेदवारीसाठी पुढे येत होती. आज मात्र दोघांनी भाजपाच्या नावाने उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने एकच चर्चा शहरात सुरू आहे. भाजपा कोणाला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार जाहीर करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
कसब्यात कोण?
कसबा येथील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पतीनेही आज उमेदवारी अर्ज घेतला. शैलेश टिळक यांनी निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र घेतले. त्यामुळे कसब्यातून भाजप शैलेश टिळक यांना तिकिट देणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबईत बैठक, उमेदवार कोण?
विधान परिषद निवडणुकीची लगबग संपल्यानंतर भाजप आता विधानसभा पोट निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी भाजपचा आज उमेदवार निश्चितीसाठी महत्त्वाची बैठक होतेय. भाजपच्या कोअर कमिटीची यासंदर्भाने आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दोन्ही मतदारसंघातील उमेदवारीवर चर्चा होणार आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पुण्यातील पोटनिवडणुकांसंदर्भात महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. पुण्यातील भाजपचा उमेदवार कोण, हे इथे नव्हे तर दिल्लीत ठरतं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मात्र घरातूनच उमेदवार देणार का, यावरून त्यांनी सूचक भाष्य केलं होतं.
घरातल्या व्यक्तीला भाजप उमेदवारी देत नाही, असं तुम्हाला कुणी सांगितलं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप आमदारांच्या कुटुंबातूनच उमेदवार देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि पत्नी यापैकी भाजप कुणाला उमेदवारी देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.