कमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे? मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण?
भोपाळ : तब्बल 15 वर्षानंतर एखाद्या राज्याचा प्रमुख म्हणून पद सांभाळल्यानंतर त्या पदावरुन पायउतार होणं काय असतं त्याचा अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलाय. शिवराज सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवत सत्तास्थापनेसाठी भाजप दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरल्यामुळे आपण सत्तेचा दावा करणार नाही, असं ते म्हणाले. मध्य प्रदेशात […]
भोपाळ : तब्बल 15 वर्षानंतर एखाद्या राज्याचा प्रमुख म्हणून पद सांभाळल्यानंतर त्या पदावरुन पायउतार होणं काय असतं त्याचा अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलाय. शिवराज सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवत सत्तास्थापनेसाठी भाजप दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरल्यामुळे आपण सत्तेचा दावा करणार नाही, असं ते म्हणाले.
मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी 230 पैकी 116 जागांची गरज आहे. काँग्रेसला 114, भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी एक-एक जागा असलेल्या बसपा आणि सपाची महत्त्वाची भूमिका आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बसपा आणि सपाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय.
काँग्रेसमध्ये आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं? खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार कमलनाथ हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शिंदे समर्थक आणि कमलनाथ समर्थकांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी आतापासूनच घोषणाबाजी सुरु केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्त्वासमोर हा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे?
ज्योतिरादित्य शिंदे या प्रभावी चेहऱ्याचा पर्यायही काँग्रेसकडे आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. नंतर देहरादूनच्या प्रसिद्ध दून स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. स्टॅरफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतलं. यानंतर ते साडे सात वर्ष अमेरिकेत राहिले आणि नोकरी केली. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले.
गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी 2002 साली निवडणूक लढली आणि निवडून आले. आतापर्यंत ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.
राजघरण्यातील असूनही साधं राहणं, सौम्य चेहरा, उदार मन आणि सरळ स्वभाव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचं वैशिष्ट्य आहे. पक्षातील युवा नेता म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या विश्वासतले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
कोण आहेत कमलनाथ?
विद्यमान मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं शिक्षण दून स्कूलमध्ये झालं. 1980 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून ते आतापर्यंत तब्बल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
मे 1996 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हवाला प्रकरणात कमलनाथ यांचं नाव आल्याने निवडणूक लढता आली नाही. या परिस्थितीमध्ये त्यांच्य पत्नी अलका कमलनाथ यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या. 1997 च्या पोटनिवडणुकीत कमलनाथ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्याविरुद्ध लढले मात्र, या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
कमलनाथ पहिल्यांदा 1991 साली वन आणि पर्यावरण मंत्री बनले. त्यांनी वस्त्रोद्योग राज्यमंत्री, केंद्रीय उद्योग मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री, शहर विकास मंत्री, संसदीय कामकाज मंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
कमलनाथ यांच्यावर सहा महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पेलली. 15 वर्षांपासून मध्य प्रदेशात वनवासात असलेल्या काँग्रेसला त्यांनी अच्छे दिन आणले. कमलनाथ यांना प्रत्येक वर्गात मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय.