तीन राज्यात मुख्यमंत्रीपद द्यायचं कुणाला? राहुल गांधींच्या डोक्याला ताप
नवी दिल्ली : काँग्रेसने अनेक वर्षांनंतर तीन हिंदी भाषिक राज्य मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता मिळवली आहे. पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय. तीन राज्यात काँग्रेसचे प्रमुख दोन गट आहेत. त्यामुळे एका गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री करावं तर दुसऱ्या गटाची नाराजी पक्षाला महागात पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये कार्यकर्त्यांचा राडा काँग्रेसचं […]
नवी दिल्ली : काँग्रेसने अनेक वर्षांनंतर तीन हिंदी भाषिक राज्य मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता मिळवली आहे. पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय. तीन राज्यात काँग्रेसचे प्रमुख दोन गट आहेत. त्यामुळे एका गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री करावं तर दुसऱ्या गटाची नाराजी पक्षाला महागात पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये कार्यकर्त्यांचा राडा
काँग्रेसचं राजस्थानमध्ये सत्तास्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण होतंय. सरकार स्थापन करण्यासाठी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आमदारांची बैठक सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्ते यासाठी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. पण राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे दोन चेहरे सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. हा वादा हाणामारीपर्यंत गेला होता.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या भाजपला पायउतार व्हावं लागलं. अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसने राजस्थानच्या 199 जागांपैकी तब्बल 99 जागांवर विजय मिळवला. इथे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा 100 हा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसला बसपाचाही पाठिंबा मिळणार आहे.
मध्य प्रदेशातही पेच
मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी 230 पैकी 116 जागांची गरज आहे. काँग्रेसला 114, भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी एक-एक जागा असलेल्या बसपा आणि सपाची महत्त्वाची भूमिका आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बसपा आणि सपाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय.
काँग्रेसमध्ये आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं? खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार कमलनाथ हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शिंदे समर्थक आणि कमलनाथ समर्थकांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी आतापासूनच घोषणाबाजी सुरु केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्त्वासमोर हा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडची परिस्थिती काय?
छत्तीसगडमध्ये 15 वर्षांनंतर सत्ता आल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये चुरस आहे. सर्वाधिक चर्चेत दोन नावं आहेत. पहिलं नाव म्हणजे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल आणि दिग्गज नेते टीएस सिंहदेव. या दोन्ही नेत्यांच्या वादालाही मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या वर्षी सेक्स सीडी कांडामध्ये बघेल अचानक चर्चेत आले आणि याप्रकरणी त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागली होती. पण काँग्रेसच्या पुनरागमनामध्ये त्यांची भूमिका नाकारुन चालणार नाही. म्हणूनच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचंही नाव घेतलं जात आहे.
टीएस बाबा या नावाने प्रसिद्ध असणारे त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव हे छत्तीसगडमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. सरगुजा या राजघरण्यातील टीएस बाबांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. माजी खासदार चरण दास महंत यांचंही नाव चर्चेत आहे.
संबंधित बातम्या :