कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती होणार की नाही अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. मात्र त्याआधीच दोन्ही पक्षांकडून प्रत्येक जागेवर चाचपणी सुरु झाली आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र जर युती झाली नाही, तर या जागेवर भाजपकडून चंद्रकांतदादा पाटील लोकसभा लढवणार अशी चर्चा जोरदारपणे सुरु झाली आहे. तसं झालं तर मग कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दादा विरुद्ध मुन्ना म्हणजेच चंद्रकात पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढत पाहायला मिळू शकते.
कोल्हापूरच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचं तगडं नेतृत्व म्हणजे चंद्रकांत पाटील. सध्या दादांकडे मुख्यमंत्र्यांनंतरचा कार्यभार आहे. त्यामुळं दादांच्या शब्दाला वजन आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी दादांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना-भाजप यांची युती होईल की नाही याचा नेम नाही. जर युती झालीच नाही तर मात्र भाजपकडे उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यावेळी भाजपकडे दादांशिवाय मोठं नाव नाही. मात्र ही चर्चा केवळ माध्यमं आणि नागरिकांमधून सुरु असल्याचं भाजपचे नेते सांगतात. शिवाय पक्षानं आदेश दिला आणि दादा उभा राहिले तर निवडून येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचा: कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!
चंद्रकांतदादा पाटील हे जर लोकसभेला उमेदवार उभे राहिले, तर कोल्हापुरातील सर्वच उमेदवारांची गणितं बिघडू शकतात. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध दादा अशी लढत होई शकते. मात्र दादांवर भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळं लोकसभेला दादा उभा राहतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.
भाजपची शिवसेनेबरोबर युती झाली नाही तर कोल्हापुरातील भाजपचे उमेदवार म्हणून दादांच्याच नावाची चर्चा सुरु झाली आहे. सेना-भाजप असो किंवा आघाडी असो, दोन्ही बाजूंनी सगळ्याच चर्चेत राहिलेला मतदार संघ म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जात आहे. त्यामुळं इथला उमेदवार कोण याकडंदेखील राज्याचं लक्ष लागलेलं असतं.
संबंधित बातम्या
कोल्हापूर लोकसभा : धनंजय महाडिकांच्या उमेदवारीला हसन मुश्रीफांचा विरोध
कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!