अजित पवारांची राजकीय खेळी, माळेगाव कारखान्यात कोण बाजी मारणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठी ताकद लावली आहे. यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.
पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी (23 फेब्रुवारी) होत आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. 2015 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता माळेगाव साखर कारखान्यात कोण बाजी मारणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे (Malegaon Sugar Factory Election).
अजित पवार यांनी या निवडणुकीत मागील 5 वर्षात कारखान्याच्या तांत्रिक बिघाडासह झालेल्या नुकसानीला लक्ष्य करत सभासदांना सत्ता देण्याचं आवाहन केलं आहे. सत्ताधारी गटाकडून या हंगामात दिलेल्या जादा ऊसदरावर सभासदांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो आहे. एकूणच अजित पवार यांनी या निवडणुकीत मागील बाबींची पुनरावृत्ती होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेयल्यानं सत्ताधाऱ्यांचा यावेळी कस लागणार आहे.
श्री नीळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ सांगवीकरांना संबोधित केलं. सहकार चळवळीतूनच आपल्या महाराष्ट्राचा कायापालट झालेला आहे. ती सहकार चळवळ पुढे वाढली पाहिजे; रुजली पाहिजे. मतांची विभागणी होणार नाही, याची काळजी घ्या, असं सूचित केलं. pic.twitter.com/RSgye87fGe
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 20, 2020
माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. शरद पवार या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचंच वर्चस्व राहिलं आहे. मात्र, मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला. त्यामुळे या निवडणुकीत विजय खेचून आणायचाच असा चंग राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बांधलाय. त्या अनुषंगाने त्यांनी कारखाना परिसरात सभा घेत कारखान्याच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.
मागील निवडणुकीत झालेल्या प्रकारांची पुनरावृत्ती होवू नये यासाठीही अजित पवार यांनी विशेष दक्षता घेतलीय. काही कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना दगा दिला होता. याचाच धागा पकडत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दम भरत जे करायचंय ते उघडपणे करा. जर तुम्ही गंमतीजंमत केली, तर मीही गंमतजंमत करेल असा इशाराच त्यांनी बंडखोर कार्यकर्त्यांना दिला.
दुसरीकडे सत्ताधारी गटाकडून सभासदांना उच्चांकी दर दिल्याचा दावा केला जातो आहे. कारखान्यात उच्च दर्जाच्या यंत्रसामुग्रीची खरेदी करुन कारखान्याची विस्तारवाढ केल्याचाही दावा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ही निवडणूक लढत असल्याचं पवारांविरोधातील पॅनलप्रमुख चंद्रराव तावरे यांनी सांगितलं आहे.
एकूणच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी दोन्ही पॅनलसह अन्य 14 अपक्ष असे एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी 23 फेब्रूवारीला मतदान होवून 24 फेब्रुवारीला मतमोजणी होत आहे. या पार्श्वभुमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळं अजित पवार यांच्यापुढे विरोधकांचा कस लागणार का याकडेच आता लक्ष लागलं आहे.
Malegaon Sugar Factory Election