बाळासाहेब ठाकरेंच्या मतदानावर बंदी का आणि कुणी घातली?
मुंबई/लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा हक्क काढून घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. मोदी म्हणाले, देशद्रोह्यांबाबत मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्व हिसकावत, मतदानाचा हक्क काढून घेतला होता. त्यामुळे मानवता शिकवणाऱ्या काँग्रेसने स्वत:चं तोंड आरशात बघावं” मोदींच्या या आरोपानंतर बाळासाहेबांच्या मतदान हक्काचा मुद्दा […]
मुंबई/लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा हक्क काढून घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. मोदी म्हणाले, देशद्रोह्यांबाबत मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्व हिसकावत, मतदानाचा हक्क काढून घेतला होता. त्यामुळे मानवता शिकवणाऱ्या काँग्रेसने स्वत:चं तोंड आरशात बघावं”
मोदींच्या या आरोपानंतर बाळासाहेबांच्या मतदान हक्काचा मुद्दा पुन्हा समोर आला.
बाळासाहेबांचा मतदानाचा हक्का का रोखला? जुलै 1999 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर होतं, त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. केवळ मतदानच नव्हे तर निवडणुकीलाही उभं राहण्यास मनाई करण्यात आली होती. नंतर 2007 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं. बाळासाहेबांनी धर्माच्या नावे मतं मागितल्याचा आरोप होता.
1987 मध्ये विलेपार्ले पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मतं मागितल्याचा आरोप होता. काँग्रेसचे विलेपार्ले येथील आमदार हंसराज भुग्रा यांचं 1987 मध्ये निधन झालं. भुग्रा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यावेळी शिवसेनेकडून डॉ. रमेश प्रभू तर काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे हे रिंगणात होते. कुंटे यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत या निकालाला आव्हान दिलं. कुंटे यांचे नाव त्यावेळी राज्यभरात चर्चेत होतं. त्याविरोधात शिवसेनेने मुंबईचे तत्कालिन महापौर डॉ रमेश प्रभू यांना मैदानात उतरवलं होतं. त्यावेळी ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन लढलेली पहिली निवडणूक होती. बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा त्यावेळी दिला होता.
बाळासाहेब ठाकरेंनी जाती-धर्माच्या आधारे मतं मागितल्याचा आरोप कुंटे यांनी हायकोर्टात केला होता. पुढे हा खटला चालला आणि 1999 मध्ये निवडणूक आयोगाने बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकारावर बंदी घातली. 1999 ते 2005 पर्यंत बाळासाहेबांवर मतदान करणं किंवा निवडणूक लढवण्यास बंदी होती. यानंतर दोन वर्षांनी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल 8 वर्षांनी बाळासाहेबांनी मतदान केलं होतं.
संबंधित बातम्या
बाळासाहेबांचं नागरिकत्व हिसकावणाऱ्या काँग्रेसवाल्यांनो आरशात तोंड बघा : मोदी