PUNE BY ELECTION : तिरंगी लढतीसाठी उमेदवार भिडले, शिंदे, फडणवीस, ठाकरे यांचे आवाहन का फसले?

साधारणतः एखाद्या सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असेल तर तेथे विरोधी पक्ष उमेदवार देत नाहीत असे संकेत आहेत. पण, या निवडणुकीत काँग्रेसने कसबा पेठ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने चिंचवड येथे उमेदवार देऊन भाजपची चिंता वाढविली.

PUNE BY ELECTION : तिरंगी लढतीसाठी उमेदवार भिडले, शिंदे, फडणवीस, ठाकरे यांचे आवाहन का फसले?
KASBA PETH AND CHINCHWAD BY ELECTIONImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 11:15 AM

महेश पवार, TV9 मराठी : पुणे शहरात होणाऱ्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत बंडखोरी होऊ नये किंवा ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने जंग जंग पछाडले. पण, भाजप – शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे असताना प्रत्यक्षात मात्र येथे तिरंगी लढत होत आहे. अर्थात याचा फटका कसबा पेठ येथे भाजपाला तर चिंचवड येथे महाविकास आघाडीला याचा फटका बसणार आहे. आपल्या पक्ष कार्यकर्त्यावर पक्ष नेत्तृत्वाचे किती वजन आहे हे ही या निमित्ताने दिसून आले. बंडखोरीचा पहिला सुरुंग फुटला तो कसबा पेठ येथील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातूनच…

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले होते. भाजपने कोकणाची जागा पटकावली तर भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात नागपूर आणि अमरावती येथे महाविकास आघाडीने मुसंडी मारली. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ही जागा जिंकली. मात्र, औरंगाबादमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे विक्रम काळे जिंकले. थोडक्यात पाच जागांपैकी महाविकास आघाडी 3, भाजप 1 आणि अपक्ष 1 अशा जागांवर विजयी झाले.

विधानपरिषद निवडणुकीत भाजप बसलेला हा जबर धक्का होता. त्यातून सावरत नाही तोच विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यातील कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली. साधारणतः एखाद्या सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असेल तर तेथे विरोधी पक्ष उमेदवार देत नाहीत असे संकेत आहेत. पण, या निवडणुकीत काँग्रेसने कसबा पेठ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने चिंचवड येथे उमेदवार देऊन भाजपची चिंता वाढविली.

कसब्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी विरुद्ध ब्राह्मण

KASBA PETH

कसबा मतदारसंघ हा 1978 पासून भाजपचाच बालेकिल्ला. येथून सतत ब्राह्मण समाजाचा उमेदवार निवडून येत आहे. पण, यावेळी येथे भाजपने भाजपचे चारवेळा नगरसेवक, दोन वेळा स्थायी समितीचे सभापती राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने ओबीसी समाजाचे नेते रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. यामुळे आता येथे ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत असेल. पण, हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत या निवडणुकीत रंगत आणली आहे. आनंद दवे यांची उमेदवारी भाजपला डोकेदुखी ठरणार अशी चिन्हे आहेत. कारण, येथील ब्राम्हण मतदार जसा भाजपच्या पाठीशी आहे तसाच तो हिंदू महासंघासोबतही आहे.

कसबा पेठेत ब्राह्मण समाज 13 टक्के आहे, तर मराठा व कुणबी ( 23 टक्के ), इतर मागासवर्ग ( 31 टक्के ), अनुसूचित जाती ( 9 टक्के ), अनुसूचित जमाती ( 4 टक्के ), मुस्लिम आणि जैन ( 17 टक्के ) असा आहे. याचाच अर्थ ब्राह्मण वगळता कसबा येथे मराठा आणि कुणबी समाजाचे मतदान अधिक आहे. ही आकडेवारी लक्षात घेऊनच दोन्ही पक्षांनी येथे ओबीसी उमेदवार दिला आहे. पण, ब्राह्मण समाजाची मते मात्र भाजप आणि हिंदू महासंघ अशा दोन ठिकाणी विभागला जाणार असल्यामुळे हेमंत रासने यांच्या अडचणी वाढणार आहेत.

15 हजार मतदारांचे स्थलांतर

कसबा पेठ हा सर्वसमावेश असा मतदारसंघ आहे. हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर हे दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत. पण, या मतदारसंघातील 15 हजार हुन अधिक मतदारांनी अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्यामुळे परंपरागत होणाऱ्या मतदारानावर परिणाम होणार आहेच. मात्र, गिरीश बापट, मुक्ता टिळक यांची विजयी परंपरा हेमंत रासने कायम राखणार का? कुणाची आणि किती ताकद पणाला लागणार हे लवकरच स्पष्ट होईल.

टिळक घराणे दुरावले

कसबा पेठ मतदारसंघात 25 वर्ष गिरीश बापट आमदार म्हणून निवडून आले. बापट लोकसभेत निवडून गेले आणि त्यांची जागा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आली. मुक्ता टिळक या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी. त्या निवडणुकीत विजयी झाल्या. पण, अल्पावधीतच त्यांना दुर्धर आजार झाला आणि त्यांचे निधन झाले.

मुक्ता टिळक यांच्या जागी त्यांचे पती शैलेश टिळक किंवा त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पण, हेमंत रासने याना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शैलेश टिळक यांनी पक्षाला गरज होती त्यावेळी मुक्ता टिळक आजारपणातही मतदानाला आल्या होत्या याची आठवण करून देत खडे बोल सुनावले. उमेदवारी न मिळाल्याने टिळक घराणे भाजपापासून दुरावले.

चिंचवडमध्ये काय होणार ?

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने अपेक्षेप्रमाणे त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचेही नाव चर्चेत होते. पण, शंकर जगताप यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले. येथे भाजपने दिवंगत आमदारांच्या कुटुंबाला उमेदवारी देऊनही राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने असा निर्णय का घेतला तर त्याचे उत्तर पंढरपूर, कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीकडे जाते. येथेही भाजपने उमेदवार देऊन बिनविरोध करण्याचे संकेत पाळले नव्हते, असा आरोप राष्ट्रवादीने केला.

चिंचवड येथे अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यात ‘काटे कि टक्कर’ होणार असे दिसत असताना शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. कलाटे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले. राहुल कलाटे हे जुने शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते. दोन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. पण, त्यात ते पराभूत झाले होते. त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेते आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर याना पाठवले होते.

स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवूनही राहुल कलाटे यांनी अर्ज कायम ठेवला. आपल्या उमेदवारीचे समर्थन करताना कलाटे म्हणतात, माझ्यापुढे जनमताचा रेटा होता. गेल्यावेळी जी काही लाट होती त्यामुळे माझा पराभव झाला. दिवंगत आमदार यांचा मतदारांवर दबाव होता. असे असतानाही माझ्यासाठी कार्यकर्ते बाहेर आले. ज्या १ लोक १२ हजार मतदारांनी मला मतदान केले त्या जनमताचा अनादर करणे मला शक्य नाही. मी लढल्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही. उलट तीन उमेदवार असतील तर मलाच फायदा होईल. ही निवडणूक एकतर्फी होईल असा दावा कलाटे यांनी केला. मतदारसंघात जी नीरा कुस्ती लढली गेली याची जनतेला चीड आहे, असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पारा चढला

राहुल कलाटे यांनी एकतर्फी निवडणूक होण्याचा दावा केला असला तरी त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पारा चढला आहे. चिचंवड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारी लढणार असे अजित पवार यांनी जाहीर केले तेव्हा राष्ट्रवादीचे नाना काटे किंवा राहुल कलाटे अशा दोन उमेदवारांची नावे चर्चेत होती. मूळचे शिवसैनिक असणारे कलाटे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली. सेना – भाजप युतीत असतानाही त्यांनी १ लाख १२ हजार मते घेऊन जगताप यांना घाम फोडला होता. त्यामुळे या निवडणुकीत कलाटे यांनाच उतरविण्याचा अजित पवार यांचा मानस होता.

चिंचववडचे तिकीट कुणाला यासाठी राष्ट्रवादीची बैठक झाली आणि अखेरच्या क्षणी नाना काटे यांच्या नावावर शिकामोर्तब केले गेले. कारण या बैठकीत स्थानिक नेत्यांनी घड्याळ चिन्हाचा प्रचार करू. बाहेरच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशा भूमिका घेतली. हा घाव सहन न झाल्याने कलाटे यांनीही चँग बांधला. त्यांच्या मनधरणीसाठी अजितदादा, उद्धव ठाकरे पुढे आले. उद्धव ठाकरे यांनी मनधरणी करूनही कलाटे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा पारा चढला आहे.

राज ठाकरे यांचे आवाहन फसले

पुण्याचे हे राजकारण सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर एक पत्र जारी केले होते. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि अंधेरी पोटनिवडणुकीचा दाखला देत त्यांनी दोन्ही जागा बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मुंबई अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने खानदानीपणा दाखविला त्याचप्रमाणे महाविकास आघाडीनेही वागावे असा सल्ला त्यांनी दिला होता. पण, राज ठाकरे यांचे हे आवाहनही महाविकास आघाडीने फेटाळून लावले. त्याचे कारण म्हणजे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळात मस्जिदीवरील भोंगा, हनुमान चालीसा, अजाणवरून राज्यात तापवलेले वातावरण, अयोध्या दौरा करण्याची घोषणा करून शिवसेनेला दिलेले आव्हान ही कारणे आहेत.

संजय राऊत खरे सूत्रधार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. खासदार संजय राऊत यांनी अगदी चाणाक्षपणे शिवसेनेची दोन्ही जागा लढण्याची तयारी आहे असे जाहीर करून टाकले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या जागा लढविल्या नाही तर शिवसेना या जागा लढविण्यास तयार आहे असा हा अप्रत्यक्ष इशाराच होता.

कारण त्याची सुरवात पुण्यातून झाली होती. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे , पुणे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी पुण्यातील सर्व शिवेसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना नीलम गोऱ्हे यांनी, मविआची वाटचाल चांगली सुरु आहे. शिवसैनिकांची मानसिकता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना सांगणार आहे. ७ तारखेपर्यंत अर्ज भरायचा असून पक्षप्रमुख यांच्याकडून ज्या सूचना येतील त्याचे पालन करू. पण, अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरु असते. पुण्यात अनेकवेळा असे दिसून आले की अनेकांचे अनेक समझोते असतात. तसे होऊन जनतेचे नुकसान होऊ नये याची काळजी आम्ही घेणार आहोत. कुणी आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ संजय राऊत यांनीही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

भाजपने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आवाहन केले. पण,महाविकास आघाडीत शिवसेना हा प्रमुख घटक पक्ष आहे याची आठवण संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपलाही या निमित्ताने करून दिली. त्यामुळेच भाजपची ही विनंती फेटाळली गेली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘त्यांची विनंती ही फक्त माध्यमातून आली आहे. कुणाचाही फोन आला नाही. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे बिनविरोध करण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगून एक प्रकारे भाजपचा चेंडू त्यांच्याच पारड्यात टोलवला. तर, अजित पवार यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा दाखला देत भाजपचे आवाहन फेटाळले. संजय राऊत यांचा ‘बाण’ योग्य ठिकाणी जाऊन बसला.

दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, आता होणाऱ्या या तिरंगी लढतीमध्ये पुणेकर कुणाच्या बाजूने कौल देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.