Maharashtra political : ….जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते माझं अख्खं कुटुंब शिवसेना सोडायला तयार आहे!
30 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपण शिवसेना सोडत असल्याचे म्हटले होते. आता असंच भावनिक आवाहान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (ShivSena) बंडोखोरी केल्याने शिवसेनेची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवण्याचे मोठे आव्हान सध्या उद्धव ठाकरेंसमोर आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखासोबतच मुख्यमंत्री देखील असल्याने पक्षासोबतच सरकार वाचवण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत बंडोखोरी केल्यानंतर शिवसेनेचे जवळपास 40 ते 45 आमदार हे पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहे. अशाही कठीण परिस्थितीमध्ये न डगमगता उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की बंडखोर आमदारांनी समोर यावे, आणि त्यांनी मला सांगावे मी मुख्यमंत्री नको आहे म्हणून मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या आधी 30 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी देखील मी शिवसेना सोडायला तयार असल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत मोठा राजकीय संदेश दिल्याचे पहायला मिळत आहे.
काय म्हटले होते बाळासाहेब ?
30 वर्षांपूर्वी 1992 साली आपण शिवसेना सोडत असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. ज्या पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलं, पक्षात प्राण फुंकला तोच पक्ष सोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे तयार झाले होते. हा सर्व किस्सा 1992 सालच्या सामनामधील एका लेखात देण्यात आला आहे. त्यावेळी शिवसेनेचे एक जुने नेते माधव देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच उद्धव आणि राज ठाकरे हे पक्षाच्या कारभारात खूप हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. मात्र या आरोपांनी बाळासाहेब ठाकरे हे दुखावले गेले होते. त्यानंतर त्यांनी सामनामधून मी आणि माझे कुटुंब शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. मात्र बाळासाहेबांच्या या भुमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये गोंधळ उडाला होता. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. तेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शांत करत म्हटले होते की मला एका तरी शिवसैनिकाने सांगावे की मी तुमच्यामुळे पक्ष सोडला. त्यानंतर मी पक्षप्रमुख पदाचा त्याग करेल. माझे कुटुंब देखील शिवसेनेमध्ये राहणार नाही.
शिवसेनेचा जनाधार वाढला
बाळासाहेब ठाकरे यांच्या या भावनिक आवाहानाचा असा फायदा झाला की, बाळासाहेबांना पक्षातंर्गत होणार विरोध मावळला. बाळासाहेबांचे विरोधक एकटे पडले आणि राज्यात पक्षाचा जनाधार वाढला. आता हीच खेळी उद्धव ठाकरे देखील खेळताना दिसत आहेत. त्यांनी बंडखोर आमदारांना आव्हान केले आहे की तुम्ही समोर या, तुम्ही जर मला सांगितले की मी मुख्यमंत्री म्हणून नकोय तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. एवढंच काय तर मी पक्षप्रमुख पद सोडण्यास देखील तयार आहे. आता हे पहाणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे की, उद्धव ठाकरे यांच्या या भावनिक आवाहानाचा शिवसैनिकांवर काय परिणाम होतो.