उस्मानाबाद बालेकिल्ला, तरीही राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यात का?
उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील घराणेशाहीमुळे, लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यातबाबत संभ्रमात असल्याची चर्चा उस्मानाबादेत रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, तरी उस्मानाबादचा उमेदवार जाहीर न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व असून सर्व महत्वाच्या पदावर डॉ पाटील परिवारातील सदस्य आहेत. निवडणुकीत घराणेशाहीचा आरोप […]
उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील घराणेशाहीमुळे, लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यातबाबत संभ्रमात असल्याची चर्चा उस्मानाबादेत रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, तरी उस्मानाबादचा उमेदवार जाहीर न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व असून सर्व महत्वाच्या पदावर डॉ पाटील परिवारातील सदस्य आहेत. निवडणुकीत घराणेशाहीचा आरोप हा इथला नेहमीच मुद्दा असतो. यावेळी डॉ पाटील लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याने, त्यांची सून अर्चना किंवा आमदार मुलगा राणाजगजीतसिंह यांना उमेदवारी देण्याचा पाटलांचा आग्रह आहे.
मोदी लाटेत सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आमदार आणि जिल्हा परिषदसह 5 नगर परिषदांवर कब्जा केला. असं असूनही उस्मानाबाद लोकसभेचा उमेदवार दुसऱ्या यादीतही जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
एकाच घराण्यातून किती उमेदवार द्यायचे, हा मुद्दा उपस्थित करत पवारांनी स्वत: लोकसभेच्या माढा मतदारसंघातून माघार घेतली. माढा मतदार संघासारखीच अवस्था उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची आहे. इथली राष्ट्रवादी म्हणजे डॉ पद्मसिंह पाटील आणि त्यांची घराणेशाही असेच काहीसे गणित आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ पाटील यांचा दारुण पराभव झाला. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी आपली सून अर्चना पाटील यांना मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. गेल्या 35 वर्षांपासून डॉ पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व आहे. या घरणेशाहीला स्वपक्षीय कार्यकर्त्यांसह सामान्य जनता कंटाळल्याचं चित्र आहे.
डॉ पद्मसिंह पाटील कुटुंबातील सदस्य सोडून उमेदवारी द्या असा सूर उमटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आपला बालेकिल्ला असूनही, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुलदस्त्यात ठेवला आहे.
उस्मानाबाद मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला आला असला तरी काँग्रेसची ताकत तुल्यबळ आहे. हम साथ साथ है असा दिखावा करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे विळा भोपळ्याचे नाते असल्याचे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत अशोक जगदाळे यांच्या पराभवाने सिद्ध झाले आहे. डॉ पाटील घराण्यातील उमेदवार नको, इतर कुणालाही उमेदवारी द्या आम्ही आघाडी धर्म पाळू, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी पवारांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घटनाक्रमामुळे डॉ पाटील घराण्यात उमेदवार देण्यास पवार इच्छुक नाहीत अशी चर्चा जिल्ह्यात रंगत आहे. भाकरी फिरवा विजय मिळेल, असा कानमंत्र पवार नेहमी देतात. मात्र पवार उस्मानाबादची घराणेशाहीची परंपरा सोडणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे स्वतः पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. सून अर्चना पाटील या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत, तर नातू मल्हार हे साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले आहेत. डॉ पाटील यांचे भाचे भूम परंडाचे आमदार राहुल मोटे हे गेली 3 टर्म आमदार असतानाही, त्यांना सत्तेत वाटा न मिळाल्याने मोटे गट नाराज आहे. डॉ पाटील यांच्या कुटुंबातील सदस्याला सत्तेचा लाभ मिळतो असा इथला अनुभव आहे. घराणेशाहीच्या आरोपामुळे डॉ पाटील यांच्या परिवारातील अनेकांना नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत दारुण पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.