महाआघाडीचं 162 आमदारांचं शक्तीप्रदर्शन, मग शरद पवारांकडून अजित पवारांची मनधरणी का?
राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (25 नोव्हेंबर) मुंबईतील हॉटेल हयात येथे शिवसेना आणि काँग्रेससह महाविकासआघाडीच्या 162 आमदारांचं शक्तीप्रदर्शन केलं (Why NCP trying to convince Ajit Pawar).
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (25 नोव्हेंबर) मुंबईतील हॉटेल हयात येथे शिवसेना आणि काँग्रेससह महाविकासआघाडीच्या 162 आमदारांचं शक्तीप्रदर्शन केलं (Why NCP trying to convince Ajit Pawar). यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्याकडं बहुमत असल्याचं ठणकावून सांगितलं. त्यावर भाजपने टीका करत काही आक्षेपही घेतले. मात्र, विधीमंडळात बहुमत चाचणीत भाजपला पराभूत करणार असल्याचा दावा महाविकासआघाडीने केला. असे दावे करत असतानाच राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या मनधरणीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जर 162 आमदार आहेत, तर मग बंडखोरी आणि पक्षविरोधी काम करणाऱ्या अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी इतका आटापिटा का असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे (Why NCP trying to convince Ajit Pawar).
महाविकासआघाडीच्या 162 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करताना शरद पवार यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आमदारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपकडे बहुमत नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वतः शरद पवार हे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरु असून आपला त्यात सहभाग नसल्याची सारवासारव करत आहेत. मात्र, शरद पवार यांच्याविरोधात जाऊन हे मनधरणीचे प्रयत्न होऊ शकत नसल्याचंही राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
अजित पवार यांनी पक्षविरोधी काम करुनही राष्ट्रवादीने अद्याप त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही. उलट त्यांना पक्षात परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न होत आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसकडे 162 आमदारांचा पाठिंबा असताना देखील अजित पवारांना समजावण्याचं कारण काय? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने मनधरणी करण्याचे प्रयत्न करुनही अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर यामागील कारण सांगितले आहे. ते म्हणाले, “अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांवर मोठा प्रभाव आहे. त्याचा परिणाम बहुमत चाचणीत दिसू शकतो अशी शंका राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे अजित पवार यांचे निष्ठावान आमदार बहुमत चाचणीत विरोधात जाऊ शकतात याची शक्यता मोठी आहे. तसं होऊ नये म्हणूनच अजित पवार यांच्या मनधरणीसाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.”
अजित पवार यांना आवश्यक आमदारांचा पाठिंबा असल्याशिवाय ते बंडखोरी करुन रात्रीतून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाहीत. याचा अंदाज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे आत्ता अनेक आमदार राष्ट्रवादीसोबत असल्याचं सांगत असले तरी ऐनवेळी मतदानाच्यावेळी ते काय निर्णय घेणार यानुसार सत्तास्थापनेची गणिते बदलणार आहेत, असंही मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना जवळपास 5 वेळा अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांना समावेश आहे. इतके प्रयत्न करुनही अजित पवार आपला निर्णय मागे घेण्यास आणि पक्षात परतण्यास तयार नसल्याचं समोर आलं आहे.
शनिवारी (23 नोव्हेंबर) दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनिल तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी जयंत पाटील दोनदा अजित पवार यांच्या घरी जाऊन दोनदा भेट घेतली. सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील व्यक्तिगतपणे संपर्क करुन त्यांना परतण्याचे आवाहन केले. रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना परतण्याची विनंती केली. रोहित पवार म्हणाले, “या महत्त्वाच्या वेळी कुटुंब आणि पक्ष एकजुट राहायला हवा. सर्वांना शरद पवार यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे.”
रविवारी अजित पवार यांनी आपलं मौन सोडत आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचा आणि आपले नेते शरद पवारच असल्याचा दावा केला. मात्र, सोबतच राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार पुढील 5 वर्ष राज्याला स्थिर सरकार देईल, असंही म्हटलं. त्यामुळे काही काळ संभ्रमाचं वाताावरण तयार झालं. त्यावर अखेर स्वतः शरद पवार यांनी पुढे येऊन भूमिका स्पष्ट केली. अजित पवार दिशाभूल करत असल्याचाही आरोप पवारांनी यावेळी केला.