Eknath Shinde : शिवसेनेच्या बंडखोरांसाठी भाजपऐवजी मनसे जास्त सुरक्षित? हो की नाही? उत्तर या 4 मुद्द्यांमधून मिळतं!
Raj Thackeray News : तीन वेळा झालेला एकमेकांमधील फोन, हा फक्त प्रकृतीच्या चौकशीसाठीच कसा असेल, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय.
मुंबई : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे (Eknath Shinde Raj Thackeray Politics) यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. दैनिक भास्करने दिलेल्लाय वृत्तानुसार एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. राज ठाकरेंवर (Raj Thackeray News) नुकतीच हिप बोनची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानं दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आलेला होता. सुरुवातील राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असावी, असं सांगण्यात आलं. मात्र आता तीन वेळा झालेला एकमेकांमधील फोन, हा फक्त प्रकृतीच्या चौकशीसाठीच कसा असेल, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. विशेष म्हणजे आता बंडखोर शिवसेना आमदार हे मनसेत प्रवेश करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. यामागची काही ठोस कारणंही सांगितली जात आहेत. ही कारणं नेमकी कोणती आहेत, ते जाणून घेऊयात…
1. बाळासाहेबांच्या विचारांचा समान धागा :
राज ठाकरेंनीही 2006 मध्ये शिवसेना सोडली. स्वतंत्र पक्ष स्थापन केला. मनसे स्थापन होऊन बरीच वर्ष झाली. अजूनही मनसे बाळासाहेबांच्या विचारांचा आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा घेऊन राजकारण करतेय. आता बंडखोरांसमोर मनसे हा एक सत्तासमीकरणासाठी उत्तम पर्याय असल्याचं बोललं जातंय.
2. भाजपची मनसेशी जवळीक? :
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपने मनसेशी जवळीक साधली असल्याचं सांगितलं जातं. मनसेला सोबत घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचंही बोललं जात होतं. मनसेला सोबत घेण्याबाबत आरएसएसनेही भाजपला हिरवा कंदील दिला होता. आता सत्ता समीकरण साधण्यासाठी भाजपात न जाता बंडखोरांना आपली बाळासाहेबांवरची श्रद्धा आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा पर्याय हा सर्वात सुरक्षित आहे, असं मानलं जातंय.
3. पालिका निवडणुकांमध्ये संघर्ष टाळण्यासाठी :
महाविकास आघाडी सरकारसोबत पालिका निवडणुका लढवताना बंडखोरांना आव्हानांचा आणि तडजोडींचा सामना करावा लागणार, असं खुद्द दीपक केसरकर यांनी मान्य केलं होतं. विनाकारण हा संघर्ष का करायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील 14 महानगर पालिका, 208 नगर परिषदा, 13 नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांत अंतर्गत स्पर्धा नको आणि भाजपसोबत युती करायची असेल, तर मनसेशिवाय दुसरा बरा पर्याय सध्यातरी एकनाथ शिंदे गटासमोर नाही.
4. मनसेसाठी राजकीय संकटात संधी? :
मुंबईत 26 टक्के मराठी मतदार आहे, तर 64 टक्के उत्तर भारतीय, गुजराती आणि अन्य भाषित मतजार आहेत. युती काळात हे सर्व मतदार भाजपसोबत शिवसेनेला मतदान करत होते. अशात जर बंडखोर मनसेसोबत गेले, तर मनसेसाठी पक्ष विस्ताराची ही मोठी संधी असणार आहेत. तसंच उत्तर भारतीय विरोधी पक्ष म्हणून असलेली प्रतिमा पुसण्यातही मनसेला काही प्रमाणात यश येऊ शकते.