“अडीच वर्षांत सभागृहात ठराव का आणला नाही?,” शहरांच्या नाव बदलावरून संजय शिरसाट बरसले
संजय राऊत यांना ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे माहीत होतं का ? आपण कुठे आहोत याचा अभ्यास त्यांनी करावा, असा सल्लाही संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांना दिला.
मुंबई : केंद्र सरकारकडून उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव, तर औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असं करण्यास मंजुरी देण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात राज्य विधिमंडळाने यास मान्यता दिली होती. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार या शहराच्या नामांतराचे श्रेय लाटत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. अंबादास दानवे यांनी ट्वीट करून हे नामांतरण फक्त संभाजीनगर जिल्ह्याचे आहे की, संपूर्ण जिल्ह्याचे आहे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून त्यांना उत्तर दिलं. केंद्राची मंजुरी प्रक्रिया झाली की, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहराचे नाव बदलते. ही अधिसूचना जाहीर झाली. त्यानुसार शहरांच्या नावात बदल झाला आहे, असं स्पष्टीकरण दिलं.
अंबादास दानवे यांना दिला अभ्यास करण्याचा सल्ला
हे सर्व सुरू असताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, दोन्ही शहरांची नावे बदलली याचं श्रेय देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचं आहे. इम्तियाज जलील यांना मोगलाईचं, औरंगाबादचं बीज तिथे पेरायचंय. तुम्ही मुलांची नावे ठेवा ना औरंगजेब, असा टोलाही लगावला. विरोधी पक्षाने अभ्यास करावा. दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलली गेली आहेत. अंबादास दानवे यांनी अभ्यास करावा. उद्धव ठाकरे अडीच वर्ष सत्तेत होते. मग त्यांनी सभागृहात ठराव का आणला नाही. काँग्रेस आणि एनसीपीने याला कधीच पाठिंबा दिला नव्हता, असंही संजय शिरसाट म्हणाले.
संजय राऊत यांना उपचाराची गरज
आम्ही सत्तेत आलो. सहा महिन्यात आम्ही नाव बदललं. तुम्ही अभिमान बाळगा. आज मी पहिल्यांदा संजय राऊतांच्या तोंडून ऐकलंय की फडणवीस यांना सनसनाटीचा छंद जडलाय. याहून मोठा कुठलाच जोक नाही. उद्धव ठाकरे यांनी जर पाहिलं असेल तर ते खळखळून हसले असतील. त्यांना उपचाराची गरज असल्याचा टोलाही शिरसाट यांनी लगावला. कायद्याची बाजू ऐका. निवडणुका कशा घेता येतील. ओबीसींना डावलू शकतो का ? आम्हाला सर्वांना न्याय द्यायचाय. संजय राऊत यांना ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे माहीत होतं का ? आपण कुठे आहोत याचा अभ्यास त्यांनी करावा, असा सल्लाही संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना दिला.
ठाकरे गटाची काय वाताहत होईल
राष्ट्रवादी पोस्टर लावलयतंय की भावी मुख्यमंत्री कोण, भविष्यात काय वाताहत होईल याचा विचार करा, असंही संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सुनावलं. संजय राऊत हे शिवसेनेचे नाहीत. ते शरद पवार आणि अजित दादांचं गुणगाण गाणारच. जे काही घडतंय ठाकरे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. संजय राऊत नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. शरद पवार यांचं ऐकून तो काम करतो, असा घणाघातही संजय राऊत यांच्यावर संजय शिरसाट यांनी केला.