भाजपचा माणूस बनणार तेलंगणाचा मुख्यमंत्री?; काँग्रेसकडे पर्यायच नाही?
चार राज्यांचे निकाल लागले आहेत. चारपैकी तीन राज्यात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. रेवंत रेड्डी हे काँग्रेसच्या तेलंगणातील विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. त्यामुळे रेवंत रेड्डी हेच काँग्रेसचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. कोण आहेत हे रेवंत रेड्डी?
हैदराबाद | 3 डिसेंबर 2023 : भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांच्या बळावर भाजपने देशातील अनेक भागात सत्ताही आणली. काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना अनेक राज्यात मुख्यमंत्रीही बनवलं. त्यामुळे भाजपवर सातत्याने टीका होत होती. मात्र, आता भाजपचा हाच कित्ता काँग्रेसही गिरवणार असल्याचं चित्र आहे. भाजपमधून आलेल्या नेत्यालाच काँग्रेस तेलंगणात मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेलंगणात भलेही भाजपची सत्ता आली नसेल, पण भाजपचा माणूसच मुख्यमंत्री होणार असल्याचं चित्रं आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पहिल्यांदाच तेलंगणात काँग्रेसचं सरकार होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण या निवडणुकीत रेवंत रेड्डी हेच केंद्रस्थानी होते. बीआरएसचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना घेरण्यासाठी रेवंत रेड्डी हे कोडांगल आणि कामारेड्डी येथून निवडणूक मैदानात उतरले होते. रेवंत रेड्डी हे 54 वर्षाचे आहेत. काँग्रेसची मोठी ताकद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रेवंत रेड्डी हे खासदार आहेत. आता ते खासदार पदावरून थेट मुख्यमंत्रीपदावर बसण्याची शक्यता आहे.
एबीव्हीपीतून सुरुवात
रेवंत रेड्डी यांच्या राजकारणाची सुरुवात एबीव्हीपीमधून झाली होती. एबीव्हीपीतून राजकारणाचे धडे गिरवल्यानंतर टीडीपीत राहिल्यानंतर आता ते तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनणार आहेत. एबीव्हीपी ही भाजपची विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेतून आलेल्या व्यक्तीला काँग्रेस आता मुख्यमंत्रीपदी बसवणार आहे. संयुक्त आंध्रप्रदेशाच्या काळात कोडांगलमधून ते आमदार बनले होते. 2009 आणि नंतर 2014मध्ये ते टीडीपीच्या तिकीटावर लढले होते. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. पण 2018मध्ये काँग्रेसमधून लढले असता त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
केसीआरलाही घाम फोडला
त्यानंतर काँग्रेसने त्यांना 2019मध्ये मल्काजगिरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. रेवंत रेड्डी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी 10 हजाराच्या मताधिक्याने टीआरएसच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं. 2018 मध्ये झालेल्या पराभवाचा त्यांनी बदला घेतला होता. 2023च्या निवडणुकीत त्यांनी केसीआर यांचा घामटा काढला होता. रेवंत रेड्डी यांच्या मेहनतीमुळेच काँग्रेस पहिल्यांदाच राज्यात सरकार बनवणार आहे.
कोण आहेत रेवंत रेड्डी
अनुमुला रेवंत रेड्डी (ए रेवंत रेड्डी) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1969 रोजी झाला. आमदार ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 2009 ते 2014 दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभा आणि 2014 ते 2018 दरम्यान तेलंगणा विधानसभेत ते होते. तेलंगणात ते टीडीपीचे आमदार होते. टीडीपीतून ते दोनदा विजयी झाले होते. ऑक्टोबर 2017मध्ये त्यांनी टीडीपी सोडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसची वाट पकडली. जून 2021मध्ये त्यांना तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.
रेवंत रेड्डी हे महबूबनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या एव्ही कॉलेजातून बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतली होती. रेवंत यांच्या बायकोचं नाव गीता आहे. गीता या काँग्रेसचे दिग्गज नेते जयपाल रेड्डी यांची भाची आहे. रेवंत आणि गीता यांना एक मुलगीही आहे.