Video : अब्दुल सत्तारांना तुरुंगात डांबणार का? नितेश राणेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, 2017चा व्हिडीओ केला ट्विट
भाजप आमदार नितेश राणे यांनी एक जुना व्हिडीओ ट्विट करून मंत्री अब्दुल सत्तारांना पर्यायाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलंय.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामधील द्वंद सर्वश्रृत आहे. त्यातही राणे कुटुंबिय आणि शिवसेनेमधील (shivasena) वार-पलटवार, आरोप प्रत्यारोप महाराष्ट्राला काही नवे नाहीत. यातच आता राज्यात हनुमान चालीसावरुन सुरु असलेल्या राजकारणात भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांनाच कारवाई करण्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. यानिमित्ताने हनुमान चालीसावरुन राज्यात सुरु असलेल्या राजकारणाला वेगवेगळं वळणं फुटतांना दिसतंय. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा जुना व्हिडीओ ट्विट करुन पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांना पर्यायाने शिवसेनेला डिवचलंय.
नितेश राणेंनी ट्विट केलेला व्हिडीओ
— nitesh rane (@NiteshNRane) April 27, 2022
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
भाजप आमदार नितेश राणे यांनी जो व्हिडीओ ट्विट केला आहे. तो व्हिडीओ 2017चा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या दहिगाव शिवारात शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणारी झाल्याचा प्रकार त्यावेळी घडला होता. त्यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्च भाषेत धार्मिक भावना दुखावतील अशी शिवीगाळ केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर त्यावेळी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यावेळी याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
नितेश राणे काय म्हणाले?
नितेश राणे यांनी या प्रकारावर बोलताना म्हटलंय की, व्हिडीओमध्ये प्रभू हनुमानाला शिव्या देणारा व्यक्ती शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करू नये, आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, असे म्हणतात. मग ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करून त्यांचे हिंदुत्व सिद्ध करून दाखवतील का, असा सवाल राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. दरम्यान, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अब्दुल सत्तार हे गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत. त्यांचे वक्तव्य विनोदासारखे असतात. मात्र, हुमानाबद्दल त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर हिंदु जनता त्याची दखल घेईल,’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणालेत.