ठाकरे-शिंदे-फडणवीस एकत्र! 3 दिग्गज सोबत येणं महायुतीची नांदी? एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
शिवाजी पार्कवरील मनसेच्या कार्यक्रमात राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर
दिनेश दुखंडे, समीर भिसेसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई : शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) 3 दिग्गज एका कार्यक्रमात एकत्र आल्यानं ही महायुतीची नांदी आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. मनसेच्या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच व्यासपीठावर शुक्रवारी दिसून आले होते. शिवाजी पार्कवर मनसेच्या झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमात तीन नेते एकत्र आल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘दीपोत्सव २०२२’चे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व श्री राज ठाकरे यांच्या सह आज केले.@mnsadhikrutचे पदाधिकारी, नेते, अनेक मुंबईकर यावेळी उपस्थित होते.@mieknathshinde @mnsadhikrut @RajThackeray (1/2)#Mumbai #Maharashtra pic.twitter.com/HzCYvFmoQX
हे सुद्धा वाचा— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2022
गणेशोत्सवापासूनच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या गाठीभेटी वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांना लिहिलेल्या विनंती पत्रांचाही सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला होता. तसंच मनसेच्या पोस्टरवर शिंदे-फडणवीस यांचे पोस्टर शुक्रवारी शिवाजी पार्कमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामुळे शुक्रवारी मनसेच्या व्यासपीठावर तीन नेते एकत्र दिसल्यानं चर्चांना उधाण आलं नसतं, तरच नवल!
ही दिवाळी सुखासमाधानाची जावो, प्रज्वलित लक्ष-लक्ष दिव्यांचा लख्ख प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनात येवो, या शुभेच्छा यावेळी असंख्य मुंबईकरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला दिल्या !!@mnsadhikrut @RajThackeray#Diwali2022 #Diwali #Deepotsav #शिवाजीपार्कदीपोत्सव #दीपोत्सव pic.twitter.com/aWyyd9kulw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंच्या निमंत्रणाला मान देऊन मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दीपोत्सव कार्यक्रमाला आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केली होती. तसं पत्रही लिहिलं होतं. राज ठाकरेंच्या विनंतीला भाजपनेही मान दिला होता. त्यानंतर आता दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र एकाच व्यासपीठावर दिसून आलेत.
पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
शिवाजी पार्कवरील मनसेच्या कार्यक्रमाचा हेतू राजकीय नव्हता. दिवाळी आपली संस्कृती आहे. दरवर्षी प्रमाणे मनसेने दीपोत्सव कार्यक्रम केला आणि त्या निमित्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हटलं. खेळी मेळीच्या वातावरणात सगळ्यांना एकत्र घेऊन दिवाळी साजरी करण्याचा हेतू होता, असंही ते म्हणाले.
शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हजेरीमुळे आता या सगळ्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. यावेळी मनसेच्या वतीने शिंदे-फडणवीस यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 3 दिग्गज नेते एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यानिमित्तानं महाराष्ट्राने अनुभवल्याच्या चर्चा आता रंगल्यात. यातून काही नवी राजकीय समीकरणं येत्या काळात पाहायला मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र तूर्तास एकनाथ शिंदे यांनी तरी याबाबचं वृत्त फेटाळलं आहे.