Rahul Mote : तानाजी सावंतांचे ‘ते’ वक्तव्य येणार का अंगलट..! विरोधकांची मागणी काय?
तानाजी सावंत यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेचे झोड उडाली आहे. अशातच त्यांच्या मतदार संघात विरोधक राहिलेले राहुल मोटे यांनी जी गोष्ट मतदार संघातील जनतेला माहिती होती ती आता राज्याला सांगितली आहे.
पुणे : चर्चेतले मंत्री म्हणून तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची ओळख यापूर्वीच महाराष्ट्राला त्यांच्या विविध वादग्रस्त विधानामुळे झाली. आता मात्र, ते थेट मराठा समाजावरच (Maratha community) बोलले होते. त्यावरुन त्यांच्यावर अधिक रोष व्यक्त होत आहे. आतापर्यंत त्यांच्यावर सडकून टीका झाली आहे. सोशल मिडियावर तर त्यांच्यावर टीकेची झोड सुरु आहे. असे असतानाच त्यांच्या मतदार संघात त्यांच्या विरोधात लढलेले राहुल मोटे (Rahul Mote) यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री तानाजी सावंत हे वाचाळवीर आहेत हे आतापर्यंत आमच्या मतदार संघातली जनतेला माहिती होते, पण आता ते मंत्री झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला देखील ही बाब ज्ञात झाल्याचे राहुल मोटे म्हणाले आहेत. त्यामुळे आता सावंत यांच्या मतदार संघात देखील त्या वक्तव्यावरुन विरोध होऊ लागला आहे.
मराठा आरक्षणाबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. विविध संघटना आणि राजकीय नेत्यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. एवढेच नाहीतर तानाजी सावंत यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे.
आतापर्यंत राज्यभरातून सावंत यांच्यावर टीका होत होती. आता मतदार संघातील विरोधक राहुल मोटे यांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे. हे केवळ आताच नाहीतर यापूर्वीही अनेकवेळा झाले आहे. समाजात तेढ निर्माण होईल, महाराष्ट्राचा अवमान होईल अशी भाषा त्याच्या भाषणातून वारंवार असतात असे मोटे म्हणाले आहेत.
‘महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण तानाजी सावंत भिकारी होणार नाही’ अशा प्रकारचे स्टेटमेंट याआधी त्यांनी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्या सर्व वक्तव्यांची याठिकाणी तपासणी होणे गरजेचे आहे. शिवाय हे धाडस होतेच कसे असा सवाल मोटे यांनी विचारला आहे.
राज्याच्या मंत्रीपदी विराजमान असताना भाषा कोणती वापरावी याचे ज्ञान त्यांना नाही. त्यामुळे राज्याचा सोडा आमच्या भूम-परंडा-वाशी मतदार संघाचे काय होणार याची चिंता असल्याचे मोटे म्हणाले आहेत.
सातत्याने अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा. शिवाय स्वतःच्या वाणीवर नियंत्रण नसलेल्या ह्या अशा वाचाळवीराला राज्याच्या महत्वाच्या पदावर राहण्याचा कसलाही नैतिक अधिकार पोचत नसल्याचेही मोटे म्हणाले आहेत.