Maharashtra politics : बंडखोर आमदारांच्या मुलांना युवासेनेच्या पदांवरून हटवण्यात येणार? आदित्य ठाकरे लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्या आमदारांच्या मुलांकडे असलेली युवासेनेची पदे काढून घेतली जावीत , अशी मगाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. शिवसेनेतील (ShivSena) आमदाराच्या एका मोठ्या गटाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेतील जवळपास 40 पेक्षा अधिक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आता या घडामोडीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बंडखोर आमदारांच्या मुलांना जी युवासेनेची पदे देण्यात आली होती, त्या पदावरून त्यांना हटवण्यात येण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली, त्या आमदारांच्या मुलांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यांनी याबाबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात काय म्हटले?
शिवसेनेचे जवळपास 40 पेक्षा अधिक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. या बंडखोर आमदारांच्या मुलांकडे युवासेनेचे विविध पदे आहेत. आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. त्यामुळे त्यांच्या मुलांची पदे देखील काढून घ्यावीत अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निवेदन आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. दरम्यान याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदारांच्या मुलांना आपली पदं गमवावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे आधिक आक्रमक झाले असून, त्यांनी काल राज्यभरातील शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधला आहे. आपल्याला शिवसेना पुन्हा एकदा उभी करायची आहे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.
सरकारसमोरील अडचणी वाढल्या
एकनाथ शिंदे हे आता महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत आहेत. लवकरच त्याबाबत त्यांच्याकडून घोषणा केली जाऊ शकते. त्यांनी 38 आमदारांचा पाठिंबा असल्याचे एक पत्र देखील सादर केले आहे. तसेच त्यांनी शिवसेना बाळासाहेब नावाच्या स्वतंत्र गटाची स्थापना देखील केली आहे. आता या गटाला मान्यता द्यायची की नाही याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. मान्यता मिळाल्यास शिवसेना आणखी अडचणीत सापडणार आहे.