शिवसेना, राष्ट्रवादीसारखाच आता काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार?; संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सरकारचं हे पहिलच अधिवेशन आहे. त्यामुळे आमदारांनी सभागृहात प्रश्न मांडले पाहिजे. सभात्याग करू नये. पैसे खर्च करून अधिवेशन होत असते. काही नालायक म्हणतात अधिवेशन आक्रमकपणे चालवू. हे त्यांनी करू नये,
औरंगाबाद | 16 जुलै 2023 : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी फूट पडली. या फुटीला एक वर्ष होत नाही तोच राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. अजित पवार यांनी बंड करून महायुतीशी हातमिळवणी केली. त्यानंतर आता काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काँग्रेस अभेद्य आहे. काँग्रेसमधील एकही आमदार फुटणार नाही, असा दावा काँग्रेस नेते करत असले तरी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधतना हा दावा केला आहे. कोणकोण येतंय हे पाहू द्या. काँग्रेस बाहेर पडणार हे निश्चित आहे. काँग्रेसचं घर फुटणार हे वारंवार सांगतोय. आम्हाला काही नको. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत हेच आमच्यासाठी पुरेसं आहे, असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
आणखी कोणी आले तर स्वागत करू
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला महायुतीत का घेतलं याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जर काही लोकं आमच्या सरकारमध्ये येत असतील तर त्यांना नाकारण्याचं कारण नाही. आम्ही चालवत असलेला कारभार योग्य आहे, असं वाटत असेल, हे सरकार दिलासा देणारं आहे असं वाटत असेल आणि त्यामुळे जर काही लोक येत असतील तर त्यांचं स्वागत करू. आणखी काही लोक आले तर स्वागत होईल. अजित पवार हे त्याच इराद्याने आले आहेत, असं शिरसाट म्हणाले.
दादा येणार माहीत होतं
अजितदादा राष्ट्रवादीला सोडतील हे आम्हाला आधीच माहीत होतं. म्हणून दादा आमच्यासोबत येतील असं मी बोलत होतो. अजितदादांना एका दिवसात महायुतीत आणलं नाही. होमवर्क एका दिवसात होत नाही. अनेक महिन्यापासून त्यावर काम सुरू असतं. सर्व गोष्टींची आधीपासून तयारी करावी लागते, असंही त्यांनी सांगितलं.
अधिवेशनानंतरच विस्तार
आगामी विस्तारात अनेक मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आमची चर्चा झाली आहे. अधिवेशनांनंतर विस्तार होईल. महाविकास आघाडीत गोंधळ होता म्हणून ते बाहेर पडले त्यांचा सन्मान ठेवायचा होता. आम्ही घरातले लोक आहोत मंत्री पद आज, उद्या मिळेल. भारत गोगावले भावनात्मक बोलले. चर्चा झाली. ते आता नाराज नाही. मला काही दिलं नाही तरी मुख्यमंत्री आमचे आहे यात समाधान आहे. उठाव करताना सत्तेची पदाची लालसा ठेवली नाही. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. 14 मंत्री करायचे आहे ते अधिवेशनांनंतर होईल, असं त्यांनी सांगितलं.