राम शिंदेंविरोधात विजय माझाच : रोहित पवार
निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणे बाकी आहे. मात्र, त्याआधीच राजकीय आखाड्यात अनेक मातब्बर आपल्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांना पराभूत करुन विजय मिळवणार असल्याचा विश्वास केला आहे.
अहमदनगर : निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणे बाकी आहे. मात्र, त्याआधीच राजकीय आखाड्यात अनेक मातब्बर आपल्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांना पराभूत करुन विजय मिळवणार असल्याचा विश्वास केला आहे. ते कर्जत येथे आयोजित कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने बोलत होते.
विशेष म्हणजे रोहत पवार यांना अद्याप उमेदवारी देखील जाहीर झालेली नाही. मात्र, त्यांनी त्यापुर्वीच आपल्या संभाव्य विधानसभा मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. मी आगामी काळात विचारांची कुस्ती खेळणार आहे. आगामी निवडणुकीत मला चांगला प्रतिसाद मिळेल आणि मीच विजयी होईल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. अहमदनगरमधील कर्जत येथे रोहित पवार यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल होतं. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
इराण, अफगाणिस्तानमधील कुस्तीपटूंसह 200 पैलवान सहभागी
‘साहेब चषक’ नावाने घेतलेल्या या स्पर्धेमध्ये 200 हून अधिक पैलवान सहभागी झाले होते. यात इराण, अफगाणिस्तान येथील पैलवानांचाही समावेश होता. वेगवेगळ्या वजन गटातील मल्लांच्या कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी कर्जत आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. शरद पवार यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप झाला.
‘ही राजकीय कुस्तीची दंगल नाही’
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार इच्छूक असून त्यांनी त्यासाठी तयारीलाही सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ही कुस्ती स्पर्धा आयोजित केल्याची चर्चा आहे. मात्र, रोहित यांनी ही राजकीय कुस्तीची दंगल नसून या भागात अनेक स्पर्धा घेतल्याचे सांगितले. तसेच आगामी काळातही या स्पर्धांच्या आयोजनाचे काम सुरुच राहिल असं नमूद केलं.